हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. मोबाईल उघडला की एकीकडे ढगफुटी, दुसरीकडे दुष्काळ, तिसरीकडे युद्धाच्या बातम्या. तर चौथीकडे अगडबंब महागाई त्यामुळे माणूस घाबरलाय. खरच जग बुडणार आहे का?
या प्रश्नाचे उत्तर मला माझे आजोबा,सुप्रसिद्ध गोंधळी कलावंत कै. विठ्ठलराव मारोतराव कडोळे यांच्या गोंधळ जागरणाचे त्यांचे आख्यान आठवून त्यामधून मिळाले. ते नेहमी सांगायचे -
"आत्मा पाण्याचा बुडबुडा आहे. आज आहे, उद्या नाही. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने आणि विश्वासाने वागा. कारण हे कलियुग आहे. येथे तुमच्या कर्माचा हिशेब तात्काळ याच जन्मात होतो. नियती कर्माचा हिशेब करून बदला घेण्याची वाट पाहत असते. तेव्हा कधीच कुणाचं वाईट करू नका. स्वतःही सुखात जगा आणि इतरांनाही सुखाने जगू द्या. कारण पुण्यांचे घरं तरणार आहेत तर पापाचे घरं बुडणार आहेत."
किती मोठे होते त्यांचे तत्वज्ञान! त्यांनी सांगितलेले आज तेच खरे होताना दिसत आहे.
आज आपण पाहतो, कुठे वैश्विक महायुद्धाच्या ठिणग्या पडून अणुयुद्धाचे ढग दाटले आहेत. रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण संघर्षाने जग बारूदच्या ढिगाऱ्यावर बसले आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता उपासमारीने अन्न-पाण्यासाठी होरपळत आहे. सत्तेसाठी, महासत्तेसाठी मानवतेला लाजवणाऱ्या घटना घडत आहेत.
निसर्गही आपला हिशेब चुकता करतोय. हेच तर कलियुगाचे लक्षण आहे.
२४-२५ ऑगस्ट २०२६ - नेपाळचा महाप्रलय - साक्षात जलप्रलयाचे दर्शन
ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती, असा महाप्रलय परवा नेपाळमध्ये घडला. दि. २४-२५ ऑगस्ट रोजी नेपाळ-चीन सीमेवर लांगटांग लिरुंग शिखराजवळील एका मोठ्या हिमनदीचा (Glacier) काही भाग कोसळला. ५२०० मीटर उंचीवरून बर्फ आणि दगडांचा महाकाय कडा १२०० मीटर खाली कोसळला आणि थेट ल्हेंडे आणि भोटेकोशी नदीत पडला.
परिणाम काय झाला? पाण्याची अगडबंब अशी ९ मीटर उंचीची राक्षसी भिंतच गावावर धावून आली. रसुवा जिल्ह्यातील गावे, पूल, रस्ते, मोठमोठे दोन -चार मजली बंगले, वीज प्रकल्प सगळे वाहून गेले. आतापर्यंत ३५९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १००० ते १४०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. त्यात १३३ भारतीय कैलास मानसरोवर यात्री आणि अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश अशा शेकडो विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. तिबेटमधील ग्यिरोंग बंदर पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.
शास्त्रज्ञ सांगतात, हे हवामान बदलाचे (Climate Change) रौद्र रूप आहे. गेल्या ३० वर्षात नेपाळच्या बर्फाचा एक तृतीयांश भाग वितळला आहे. हिमनद्या ६५% वेगाने वितळत आहेत. हा ढगफुटी नाही, हा हिमप्रलय आहे. जेव्हा माणूस निसर्गाला ओरबाडतो, तेव्हा निसर्ग असाच बदला घेतो. हाच तर कर्माचा हिशेब आहे.
दुसरीकडे भारतात - अल निनोचा दुष्काळ
एकीकडे नेपाळ बुडत आहे, तर दुसरीकडे आपला भारत देश जळत आहे. याला कारण आहे - महाभयंकर अल निनो.
हवामान खात्याने (IMD) यावर्षीच्या पावसाचा अंदाज ९२% LPA म्हणजेच सरासरीपेक्षा कमी वर्तवला आहे. जूनमध्ये ३५.४% कमी पाऊस, जुलैमध्ये थोडी उसंत आणि ऑगस्टमध्ये पुन्हा १५% ची तूट. एकूण मान्सून आतापर्यंत १३% कमी आहे.
अल निनो म्हणजे पॅसिफिक महासागराचे पाणी तापणे. त्यामुळे भारताचा मान्सून कमकुवत होतो. जागतिक हवामान संघटना (WMO) सांगते आहे की ऑगस्ट-ऑक्टोबर २०२६ मध्ये हा अल निनो सुपर स्ट्रॉंग होणार आहे.
त्याचा फटका कुठे बसणार?
पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, जबलपूर, सागर ही राज्ये दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्याचा मोठा भू-भाग, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये २५% हून अधिक पावसाची तूट आहे. धरणे रिकामी आहेत. खरीप पिके धोक्यात आहेत.
आणि गंमत पहा, याच अल निनोमुळे तामिळनाडूतील चेन्नईमध्ये अतिवृष्टी आणि महापुराचा धोका आहे. २०१५ साली असेच झाले होते. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे जलप्रलय - हेच तर कलियुगाचे रूप नाही का?
मग जगबुडी होणार का?
शास्त्र सांगते, कलियुगाचा अंत जलप्रलयानेच होईल. पण तो प्रलय एका दिवसात होणार नाही. तो हळूहळू होतोय. आज ढगफुटीच्या रूपात, उद्या भूकंपाच्या रूपात, परवा दुष्काळाच्या रूपात.
आज रस्ते अपघात, खून, महामारी, भूकंप, महापूर या घटना वाढल्या आहेत. कारण माणूस वसुंधरेला अंधारात लोटत आहे. जंगल तोडत आहे, प्लास्टिक टाकत आहे, नद्या मारत आहे.
म्हणून कै. विठ्ठलराव कडोळे म्हणायचे तेच खरे आहे. पुण्याचे घर तरणार आहे. जो माणूस निसर्गाशी, माणसाशी प्रेमाने वागेल, झाड लावेल, पाणी वाचवेल, कुणाचे वाईट करणार नाही, त्याचेच घर या प्रलयात तरणार आहे.
जगबुडी बाहेर नाही, ती आपल्या कर्मात आहे. आपण जर आजही बदललो, एकमेकांना मदत केली, निसर्ग जपला, तर हा जलप्रलय टळू शकतो. नाहीतर नियती आपला हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.
चला, या पवित्र श्रावणात अन्नधान्य भोजन दान वस्त्रदानाचा संकल्प करू या - स्वतः सुखात जगू आणि इतरांनाही सुखाने जगू देऊ.
लेखक - संजय मधुकरराव कडोळे ( महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक, लोककलावंत, पत्रकार )
गोंधळीनगर, कारंजा (लाड) जि. वाशिम
मो. 9075635338
0 Comments