Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाचे औचित्य साधत झोपडपट्टीतील नागरिकांची आरोग्य तपासणी


द्वारकामाई संगीत महफिल ग्रुपचा सामाजिक उपक्रम; औषधोपचारासह गरजू महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान

कारंजा : प्रतिनिधी कामाक्षी सोने — वाढदिवसाचा खर्च केवळ औपचारिक कार्यक्रमांवर न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आदर्श उपक्रम द्वारकामाई संगीत महफिल ग्रुप, कारंजा यांच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. कुंदन श्यामसुंदर यांच्या अर्धांगिनी सौ. छायाताई श्यामसुंदर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावाबाहेरील झोपडपट्टी परिसरातील महिला, पुरुष, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या उपक्रमात गरजू नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार विविध औषधांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांना कृमिनाशक औषधे तसेच जीवनसत्त्वांच्या बाटल्या देण्यात आल्या. महिलांसाठी कॅल्शियम, आयर्न व व्हिटॅमिनच्या गोळ्या व औषधे उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीसाठी जॉइंट ऑइल, तर जखमा असलेल्या नागरिकांना आवश्यक अँटिबायोटिक क्रीम देण्यात आली.

आरोग्य तपासणीसोबतच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे सौ. छायाताई श्यामसुंदर यांनी परिसरातील दोन गरजू महिलांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान केला. साडी मिळाल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून मनाला मोठे समाधान मिळाले. “गरजू महिलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला,” अशी भावना छायाताईंनी व्यक्त केली.

या उपक्रमास डॉ. कुंदन श्यामसुंदर, डॉ. आशिष सावजी, महेंद्र खरटडे, नायब तहसीलदार देवेंद्र मुकुंद, सुधीर नखाते, संजय सांगळे, नंदकिशोर कव्हाळकर, शिवाजीराव गायकवाड, सिद्धू नवघरे, छायाताई श्यामसुंदर, दीपा पवार, कुलश्री सावजी, पल्लवी नवघरे, माया धोटे, अर्चना कदम, कामाक्षी सोने आणि शारदा भुयार यांची उपस्थिती होती.

वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा आणि मदत पोहोचविण्यासाठी यापुढेही द्वारकामाई संगीत महफिल ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा मानस ग्रुपचे अध्यक्ष डॉ. कुंदन श्यामसुंदर यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments