मंगरूळपीर, प्रतिनिधी:
मंगरूळपीर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात साजऱ्या करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती सोहळ्याने यंदा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाची चौकट ओलांडत सामाजिक, राष्ट्रीय आणि वैचारिक भूमिका स्पष्ट करणारा ऐतिहासिक संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान दिल्ली पोलिस व रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांच्या धाडसी व कर्तव्यनिष्ठ कार्याचा गौरव करणारा ठराव तसेच १ ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करणारा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. उपस्थितांनी हात वर करून या दोन्ही ठरावांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविल्याने संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला.
जयंती सोहळ्याचे अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे प्रखर योद्धे होते. त्यांनी आपल्या लेखणीतून उपेक्षित, वंचित, कष्टकरी आणि सामान्य माणसाचा आवाज जगासमोर पोहोचविला. त्यांच्या साहित्यामध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता, मानवी मूल्ये आणि संघर्षाची जाज्वल्य प्रेरणा आहे. आजच्या पिढीने अण्णाभाऊंचे साहित्य वाचून त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे."
यावेळी मंजूर करण्यात आलेल्या ठरावांमध्ये दिल्ली पोलिस व RAF जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखत नागरिकांच्या सुरक्षेसाठी बजावलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाला 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून अधिकृत मान्यता देत राज्यभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय हा साहित्यविश्वासाठी आणि नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करण्यात आले. या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करणारा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मात्र, या कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे प्रमुख राजकीय नेत्यांचे अकाली निर्गमन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले; परंतु त्यानंतर कामाच्या व्यस्ततेचे कारण देत मुख्य कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमस्थळ सोडले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांनी जयंतीसारख्या ऐतिहासिक कार्यक्रमात संपूर्ण वेळ उपस्थित राहून समाजाशी संवाद साधणे अपेक्षित असताना केवळ औपचारिक उपस्थिती लावून निघून जाणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव संजय सतई यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि युवकांनी देशहितासाठी सजग राहण्याची गरज यावर भाष्य केले. किसान मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद पाटील जाधव यांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सौ. मनिषा तागडे, राजूभाऊ आमटे, दीपक अंभोरे, विशाल खंडारे, अशोक चवरे आणि सुखदेव झोंबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारप्राप्त भगवानराव पिसोळे यांनी केले. त्यांनी अण्णाभाऊंच्या स्मारकाच्या जतनासह त्यांच्या विचारांच्या प्रसारासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर तायडे यांनी ओघवत्या शैलीत केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नांदेडचे सुप्रसिद्ध शाहिर विजय पवार व त्यांच्या संचाने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनपर पोवाडे, जनजागृतीपर गीते आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती सादर केल्या. या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वारंवार टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत केले.
तालुक्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, साहित्यप्रेमी आणि समाजबांधव या जयंती सोहळ्यास उपस्थित राहिले. संपूर्ण कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर, सामाजिक समतेचा संदेश आणि राष्ट्रीय कर्तव्यभावनेचा ठाम उच्चार ऐकायला मिळाला. ठरावांच्या माध्यमातून जयंतीला वैचारिक दिशा देणारा हा सोहळा मंगरूळपीरच्या सामाजिक इतिहासात विशेष ठसा उमटवून गेला.
0 Comments