१ लाख ८० हजारांचा सडवा मोहामाचसह २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त; अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ
मानोरा : प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून, ग्राम सेवादासनगर येथे सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर मानोरा पोलिसांनी छापा टाकून तब्बल २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील) यांच्या आदेशानुसार अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मानोरा पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत सेवादासनगर येथील एका व्यक्तीकडून गावठी हातभट्टी दारू गाळून तिची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी भीमराव हिरासिंग जाधव, रा. सेवादासनगर याच्या घरालगतच्या गोठ्याची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठीचा सडवा मोहामाच व तयार दारू आढळून आली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येकी ३०० लिटर प्रमाणे एकूण १ हजार ८०० लिटर सडवा मोहामाच, अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये, तसेच ३ टोपल्यांमध्ये एकूण १५० लिटर सडवा मोहामाच, किंमत १५ हजार रुपये, एका कॅनमध्ये १०० लिटर गावठी हातभट्टी दारू, किंमत १० हजार रुपये, तसेच हातभट्टीसाठी लागणारे साहित्य अंदाजे १३ हजार रुपये, असा एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गावठी हातभट्टी दारूमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट ओढवते. प्रमाणित नसलेल्या अशा दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातील महिला व नागरिकांकडून स्वागत होत असून, अवैध हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर वचक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, परिसरात कुठेही अवैध दारू, जुगार किंवा इतर अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोहेकॉ राधेश्याम महल्ले, गणेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रोहन तायडे, चेतन राऊत, अनिल दहातोंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा लोखंडे तसेच चालक पोलीस हवालदार करण चव्हाण यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ गणेश राठोड करीत आहेत.
अवैध हातभट्टीला पोलिसांचा दणका; २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
0 Comments