Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप!

मंगरूळपीरमध्ये राजकीय वातावरण तापले; ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही’ — शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगरूळपीरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन परळीकर, तालुकाप्रमुख अर्जुन भीमराव पाटील सुर्वे यांच्यासह काही शिवसैनिकांना मंगरूळपीर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा वाशिम दौरा दुष्काळसदृश परिस्थिती आणि नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगरूळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक व पाणी परिस्थितीची माहिती घेतली.

‘शेतकऱ्यांचा आवाज मांडू नये म्हणून नजरकैद?’

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असल्याचा उल्लेख शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे ताब्यात ठेवण्याची गरज काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

दुष्काळ, पीक नुकसान आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडण्याची तयारी असताना पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’

मंगरूळपीर पोलिस ठाण्यात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘सत्तेच्या दबावामुळे शेतकऱ्यांचा आणि शिवसैनिकांचा आवाज दाबता येणार नाही,’ अशी भूमिका पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली.

‘मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अधिक वेळ दिला असता तर बरे झाले असते’

शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन भीमराव पाटील सुर्वे यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली.

“शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा असेल तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून आम्ही हजार वेळा हा गुन्हा करू. आम्हाला नजरकैदेत ठेवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अधिक वेळ दिला असता तर बरे झाले असते,” असे सुर्वे यांनी म्हटले.

दरम्यान, उपजिल्हाप्रमुख सचिन परळीकर यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे हा आमचा अधिकार आहे. पदाधिकाऱ्यांना ताब्यात ठेवून प्रश्न सुटणार नाहीत; शेतकऱ्यांच्या बांधावरची वस्तुस्थिती शासनाने ऐकली आणि त्यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दुष्काळाच्या छायेत शेतकरी; आता निर्णयाची प्रतीक्षा

वाशिम जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा केला. मोहगव्हाण येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी नुकसानाची माहिती घेतली.

मंगरूळपीर तालुक्यात यापूर्वीही कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली होती.

त्यामुळे आता नजरकैद, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत कधी पडणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बळीराजाच्या करपलेल्या पिकांकडे पाहून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments