राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाच्या अवस्थेवर सामाजिक कार्यकर्ते गौरव इंगळे यांचा संतप्त सवाल
वाशिम | सुधाकर चौधरी
“साहेब, कारभार रामभरोसे आहे का?” असा थेट सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते गौरव इंगळे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, वाशिमच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रीय महामार्गांची देखभाल, सुरक्षितता आणि आवश्यक सोयी-सुविधांची जबाबदारी असलेल्या विभागाच्या कार्यालयालाच भगदाड पडल्याचे चित्र समोर आल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
गौरव इंगळे यांनी कार्यालयाच्या परिसरातील या अवस्थेकडे लक्ष वेधत, “ज्या विभागाच्या कार्यालयाचीच अशी अवस्था आहे, तो विभाग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची व्यवस्था कितपत सक्षमपणे सांभाळत असेल?” असा सवाल केला आहे.
महामार्गांवरील समस्यांकडे दुर्लक्ष?
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर दिशादर्शक फलकांची कमतरता, खराब किंवा भगदाड पडलेले फलक, रस्त्यावरील भेगा वेळेवर न बुजवणे, आवश्यक ठिकाणी रबरचे गतिरोधक नसणे तसेच सिग्नल व्यवस्थेचा अभाव अशा विविध समस्या असल्याचा दावा इंगळे यांनी केला आहे.
या समस्यांबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अपघातप्रवण ठिकाणी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी अपघात झाल्यानंतरच हालचाल होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“अपघाताची वाट पाहायची का?”
रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणे आधीच ओळखून तेथे आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित असताना, वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग म्हणजे केवळ डांबरी रस्ता नव्हे; तर त्यावर प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आहे. त्यामुळे दिशादर्शक फलक, गतिरोधक, सिग्नल, रस्त्याची दुरुस्ती आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना याकडे केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष देण्याची गरज आहे.
कार्यालयाची अवस्था विभागासाठी आरसा?
सामाजिक कार्यकर्ते गौरव इंगळे यांनी समोर आणलेल्या छायाचित्रामुळे राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाच्या देखभालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाची भिंत आणि परिसराची झालेली अवस्था पाहता संबंधित विभागाने स्वतःच्या कार्यालयाचीच तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
महामार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी असलेल्या विभागाच्या कार्यालयालाच जर भगदाड पडत असेल, तर “महामार्गांची व्यवस्था नेमकी कोण आणि कशी सांभाळत आहे?” हा सवाल अनुत्तरित राहतो.
— वाशिम खबर आवाज महाराष्ट्र
0 Comments