Ticker

6/recent/ticker-posts

गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन ‘अलर्ट’!


शांतता, सामाजिक सलोखा अन् कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य; शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाचा निर्धार

“उत्सव जल्लोषात साजरा करा; मात्र कायद्याची चौकट ओलांडू नका!” — लता फड

मंगरूळपीर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंगरूळपीर पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, उत्सव श्रद्धेचा असला तरी कायदा-सुव्यवस्था ही सर्वोच्च जबाबदारी असल्याचा स्पष्ट संदेश शांतता समितीच्या बैठकीतून देण्यात आला. गणेशोत्सव उत्साहात, आनंदात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक लता फड यांनी केले.

मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, सामाजिक सलोखा, सीसीटीव्ही यंत्रणा, सोशल मीडियावरील अफवा तसेच संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपविभागीय अधिकारी रवी काळे, पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल शिरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शेळके, नायब तहसीलदार रवी राठोड, अन्सार मौलाना यांच्यासह शांतता समितीचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.

पूर्वतयारीवर पोलिसांचा भर

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शांतता समितीची बैठक घेऊन प्रशासनाने विविध घटकांशी थेट संवाद साधला. संभाव्य समस्या, वाहतुकीचे प्रश्न, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा करून प्रतिबंधात्मक पावले उचलण्यावर भर देण्यात आला.

“उत्सव जल्लोषात साजरा करा; मात्र कायद्याची चौकट ओलांडू नका,” असे आवाहन पोलिस उपअधीक्षक लता फड यांनी करताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

प्रत्येक गणेश मंडळाने सीसीटीव्ही बसवावे

गणेश मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास तपासाच्या दृष्टीने सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावर प्रशासनाने भर दिला.

अफवांना थारा नको; सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर

गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून अफवा, चुकीचे संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर प्रसारित होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कोणताही संदेश सत्यता पडताळल्याशिवाय पुढे पाठवू नये, असा स्पष्ट सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला.

सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश अथवा फोन कॉलला प्रतिसाद न देण्याबाबतही नागरिकांना सतर्क करण्यात आले.

“मंगरूळपीरची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवा!”

मंगरूळपीर शहराची ओळख सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची राहिली आहे. ही परंपरा आगामी गणेशोत्सवातही कायम ठेवण्याची सामूहिक जबाबदारी सर्व समाजघटकांची असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

धार्मिक उत्सव साजरा करताना इतरांच्या धार्मिक भावना, परंपरा आणि श्रद्धेचा आदर राखावा, असे आवाहनही करण्यात आले.



सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कांबळे यांचा सलोख्याचा संदेश

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करताना गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविणारा उत्सव ठरावा, अशी भूमिका मांडली. शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

“जीआरप्रमाणे गणेश मंडळांना पोलिसांचे सहकार्य मिळावे” — गजू रघुवंशी

गणेश मंडळाचे अध्यक्ष गजू रघुवंशी यांनीही बैठकीत आपली भूमिका मांडली. शासनाच्या जीआरनुसार गणेश मंडळांना आवश्यक ते सहकार्य पोलिस प्रशासनाने करावे, अशी विनंती त्यांनी केली. उत्सवाचे आयोजन करताना मंडळांकडून प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाईल; मात्र प्रशासनानेही शासन निर्णयानुसार मंडळांना आवश्यक सुविधा व सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाचा स्पष्ट संदेश; उत्सव शांततेतच होणार!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची पूर्वतयारी, पोलिस यंत्रणेचा समन्वय आणि शांतता समितीच्या माध्यमातून नागरिकांशी साधलेला थेट संवाद यामुळे “उत्सव उत्साहाचा, पण कायदा-सुव्यवस्था सर्वांत महत्त्वाची” असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

गणेशोत्सव जल्लोषात साजरा करताना शांतता, संयम, सामाजिक सलोखा आणि कायद्याचा सन्मान राखण्याचे आवाहन करत शांतता समितीची सभा संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments