मंगरूळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
मंगरूळपीर : सुधाकर चौधरी
पाऊस गायब, पिके वाळली आणि शेतकरी संकटात! मंगरूळपीर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. सोयाबीनसह इतर पिके हातातून जाण्याची वेळ आली असताना शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डफळे वाजवत आंदोलन करण्यात आले.
‘झोपलेल्या सरकारला जागे करा’ असा संदेश देत करण्यात आलेल्या या आंदोलनात मंगरूळपीर तालुका तातडीने कोरड्या दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी करण्यात आली.
ऑगस्टमध्ये अवघा 15.10 टक्के पाऊस
तालुक्यात मागील महिन्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 15.10 टक्के पाऊस झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी शेतातील सोयाबीन पीक वाळत असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या पदरात कर्ज, खर्च आणि आता नुकसानीचे संकट
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला. मात्र, पीक निर्णायक अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात आला आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी, मंगरूळपीर यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये—
- मंगरूळपीर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी.
- प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत तातडीने जाहीर करावी.
- शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावा.
- विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा.
- पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष मदत द्यावी.
निर्णय नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला.
‘हा लढा सत्तेसाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीसाठी आहे,’ अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.
आंदोलनात जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे सचिन परळीकर यांच्यासह प्रशांत सुर्वे, बंडूभाऊ भिकाजी वैद्य, अनिताताई सिरसोदे, अर्जुन भीमराव सुर्वे, निखिल इंगोले, भागवत शिंदे, शिवा सावके, सुभाष शिंदे, अशोक हांडे, ओम इंगळे, राहुल माळी, भास्कर मुळे, गजानन आसरे, महेंद्र ठाकरे, रामराव वाघमारे, दीपक वानखडे, संतोष मांडवगडे, योगेश जाधव, पंकज राऊत, नरेंद्र भोयर, दिनेश तेलंग, साहेबराव बेंद्रे, राम बोथे, बाळकृष्ण रोकडे, प्रवीण मिसाळ, विनोद वैद्य, राम चौधरी, किशोर गावंडे, नितेश खडसे, गौरव बोरकर, प्रवीण गायकवाड, पाचू गायके, सईद भाई, मंगेश साळवे, शेखर ठाकरे, संतोष पवार, वेदांत शर्मा, पंजाब महाजन, पुरुषोत्तम भुजाडे, गणेश राऊत, वैभव लुंगे, विठ्ठल लांभाडे, यज्ञेश पाटील, मोहन सावके यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments