आंदोलनास परवानगी नाकारली; अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
वाशिम | सुधाकर चौधरी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी समृद्धी महामार्गावर प्रस्तावित करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनाला वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहिती व अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या व विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, आंदोलन करताना सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता
समृद्धी महामार्गावर रास्तारोको झाल्यास या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, कामगार तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. औद्योगिक व कृषी मालाच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याबरोबरच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सार्वजनिक रस्ता अडविणे योग्य नसल्याचा न्यायालयाचा दाखला
आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक रस्ते अडविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अमित साहाणी विरुद्ध पोलीस आयुक्त व इतर’ या प्रकरणातील न्यायनिर्णयाचा दाखला पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक मार्गावर वाहतूक रोखून सर्वसामान्य नागरिकांना अडथळा निर्माण करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अप्रमाणित सोशल मीडिया पोस्टपासून सावध राहण्याचे आवाहन
वाशिम जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवरील अप्रमाणित माहितीच्या आधारे कोणत्याही आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. समृद्धी महामार्गावरील वाहतूक अडविणे, नागरिकांना अडथळा निर्माण होईल असे कृत्य करणे अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कायदा हातात घेतल्यास कारवाईचा इशारा
प्रस्तावित बेकायदेशीर रास्तारोको आंदोलन करू नये, तसेच या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन अथवा अपप्रेरणा देऊ नये. कोणत्याही स्वरूपाचा दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच लागू असलेल्या इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाचा अवलंब करा
नागरिकांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी कायदेशीर व शांततापूर्ण मार्गाचा अवलंब करावा. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी अथवा अफवा पसरविणारी माहिती प्रसारित करू नये. कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद माहिती निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसह जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास हातभार लावावा, असे आवाहन पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
— सुधाकर आढे
पोलीस निरीक्षक, स्थागुशा तथा जनसंपर्क अधिकारी,
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम
0 Comments