• राज्यातील ३८५ कंपन्यांचा सहभाग, ६५,६७५ पदे उपलब्ध
राज्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने १२ व १३ डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३८५ कंपन्या सहभागी होत असून त्यांनी सुमारे ६५ हजार ६७५ रिक्त पदांची मागणी नोंदविली आहे.
राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये आतापर्यंत प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हीसेस, महिंद्रा स्टील सर्व्हीस सेंटर, एल जी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायर ॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह लि., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ), मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्शन सोल्युशन प्रा. लि., ॲडविक हाय-टेक, युकेबी इलेक्ट्रॉनिक्स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रूमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स इत्यादी सारख्या नामांकित कंपन्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदविलेली आहेत.
*मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक*
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक युवक-युवतींनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. होम पेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगीनमधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर ‘डॅशबोर्ड’ मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम आपला विभाग व नंतर आपला जिल्हा निवडून त्यातील ‘स्टेट लेव्हल मेगा जॉब फेअर’ (STATE LEVEL MEGA JOB FAIR) या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस , दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. अधिक माहितीकरिता वाशिम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त बजाज यांनी केले आहे.
*****



0 Comments