Ticker

6/recent/ticker-posts

ललवाणी ॲग्रो टुरिझम म्हणजे परिसरासाठी मनोरंजनाची पर्वणी : मंत्री संजय सावकारे


जळगाव / भुसावळ परिसर

भुसावळ : येथून जवळ असलेल्या कुऱ्हे पानाचे शिवारात प्रा. डॉ. दिलीप ललवाणी यांनी उभारलेल्या ‘ललवाणी ॲग्रो टुरिझम’ व ‘मन-जिया रेस्टॉरंट’सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या वेळी भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, माजी आमदार मनीष जैन, उद्योजक राधेश्याम लाहोटी, शिक्षणतज्ज्ञ संजय गरुड, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, जळगावचे वकील अकील इस्माईल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, ललवाणी ॲग्रो टुरिझम हे भुसावळ, जामनेर, जळगाव व बोदवड या भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ते सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथे सातत्याने नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून हा उपक्रम परिसरासाठी मनोरंजनाची पर्वणी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा देताना येथे प्रवेश करताच आल्हाददायक व निसर्गरम्य वातावरणाचा सुखद अनुभव मिळाल्याचे सांगितले. माजी आमदार मनीष जैन यांनी ललवाणी कुटुंबाच्या कार्याचे कौतुक करत प्रा. डॉ. दिलीप ललवाणी यांच्या परिश्रमांचे हे यश असल्याचे नमूद केले. वयाच्या ६६ व्या वर्षीही ते तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने नवनवीन कल्पना साकारत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी प्रा. ललवाणी यांनी संघर्षातून आपले विश्व उभे केले असून चिकाटी व धैर्याच्या जोरावर त्यांनी यश संपादन केल्याचे सांगितले. शिक्षणतज्ज्ञ संजय गरुड यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला सलाम केला. उद्योजक राधेश्याम लाहोटी यांनी गोसेवा हा प्रा. ललवाणी यांचा मुख्य संकल्प असून त्यांनी उत्कृष्ट गोशाळा उभारल्याचे सांगितले.

अॅड. अकील इस्माईल यांनी प्रा. ललवाणी यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी आयुष्यात नफ्यापेक्षा माणुसकी, प्रेम व आपुलकीला अधिक महत्त्व दिल्याचे अधोरेखित केले.


निसर्गरम्य वातावरणात पार पडला सोहळा

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परिसर निसर्गरम्य सजविण्यात आला होता. प्रमुख पाहुण्यांना सजवलेल्या बैलगाडीतून उद्घाटन स्थळी नेण्यात आले, तर सनई-चौघड्यांच्या मंगलध्वनीत स्वागत करण्यात आले. भुसावळ, जामनेर व जळगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

सांस्कृतिक रंगत आणि खानदेशी मेजवानी

कार्यक्रमाची सुरुवात गणेश आरती व नवकार महामंत्राने झाली. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका दिपाली सोनार यांनी केले. त्यांच्या खुमासदार शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.

यानंतर ज्युनियर भाऊ कदम यांच्या हास्य कार्यक्रमाने उपस्थितांना खळखळून हसवले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी खास खानदेशी मेनूचा आस्वाद घेतला.

आकर्षक सुविधा आणि समाधानाची भावना

ललवाणी ॲग्रो टुरिझममध्ये स्वच्छता, निसर्गसौंदर्य, रेन डान्स, बांबू हाउस कुटीर, पंचवटी, उत्कृष्ट निवास व्यवस्था, नेत्रसुखद रोषणाई अशा विविध सुविधांमुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदनलाल ललवाणी, नलीन ललवाणी, प्रा. डॉ. दिलीप ललवाणी व आदेश ललवाणी यांनी स्वागत केले.

एकूणच, या उपक्रमामुळे परिसरात पर्यटन व मनोरंजनाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments