Ticker

6/recent/ticker-posts

रायसोनी विद्यापीठात ‘MIGS–2026’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा भव्य प्रारंभ



अमरावती, अनिता यादव

दि. १८ एप्रिल : बहुशाखीय संशोधन, नवकल्पना आणि जागतिक शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी ‘मल्टिडिसिप्लिनरी इनोव्हेशन्स फॉर ग्लोबल सस्टेनेबिलिटी अँड डेव्हलपमेंट (MIGS–2026)’ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे उत्साहात सुरू झाली. १७ व १८ एप्रिल २०२६ दरम्यान हायब्रिड पद्धतीने आयोजित या परिषदेत देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.


रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी व कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते.

उद्घाटन सत्रात आयआयआयटी नागपूर येथील डॉ. स्नेहल शिंदे तसेच एनआयटी जालंधरचे डॉ. रोशन बोडिले यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करताना बहुशाखीय नवकल्पनांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी जागतिक शाश्वतता, तंत्रज्ञानातील प्रगती आणि संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक व औद्योगिक समस्यांवर उपाय शोधण्याची गरज स्पष्ट केली. भविष्यातील विकासासाठी संशोधनाधारित दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डीन डॉ. अमित गायकवाड उपस्थित होते. त्यांनीही परिषद ही विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी ज्ञानवृद्धीची महत्त्वपूर्ण संधी असल्याचे सांगितले.

या परिषदेच्या माध्यमातून संशोधकांना त्यांच्या संशोधन निष्कर्षांचे सादरीकरण करण्याची, नवीन कल्पनांची देवाण-घेवाण करण्याची आणि जागतिक स्तरावरील आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाश्वत विकास, तंत्रज्ञान, पर्यावरण, कायदे आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा होत आहे.

परिषदेच्या पहिल्या दिवशी एकूण ११ विविध ट्रॅक्समध्ये तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (EXTC), फार्मसी, कायदे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फॉरेन्सिक सायन्स, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स, केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांचा समावेश होता. या सत्रांमध्ये संशोधक, प्राध्यापक आणि उद्योग तज्ज्ञांनी आपले संशोधन सादर करत परस्पर संवाद साधला. यामुळे ज्ञानविनिमयासोबतच नव्या संशोधनाच्या संधीही निर्माण झाल्या.

परिषदेचे संयोजक डॉ. महिप एम. बरतेरे आणि डॉ. गिरीश एस. भावेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले, तर सह-संयोजक डॉ. विनय ए. राजगुरे आणि डॉ. प्रतिक्षा चाफळे यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या समन्वयामुळे परिषद सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडत आहे.

पहिल्या दिवसाची सर्व सत्रे अत्यंत सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सहभागी संशोधकांकडून या परिषदेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. दुसऱ्या दिवसाच्या तांत्रिक सत्रांसाठी भक्कम पाया तयार झाला असून, अधिक सखोल चर्चांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही परिषद जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या बहुशाखीय संशोधन, नवकल्पना आणि शाश्वत भविष्य घडविण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असून, जागतिक स्तरावर शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात विद्यापीठाची ओळख अधिक दृढ करणारी ठरत आहे.


Post a Comment

0 Comments