Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड ग्रामपंचायत, नगरपरिषद निवडणूक सर्व जागा लढवणार तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु यांची माहिती


मंगरुळपीर: प्रस्तापितांविरुद्ध विस्थापितांना निवडणुकीत उभे करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज असून आगामी ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढवणार असा निर्धार संभाजी ब्रिगेडने केला आहे.आणि म्हणूनच तालुक्यातील आगामी निवडणुका संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननभाऊ भोयर व जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड लढवणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु यांनी दिली आहे.

गेल्या ३० वर्षांपासून संभाजी ब्रिगेडने शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. वैचारिक तरुणांचे बलशाली संघटन म्हणून संभाजी ब्रिगेडला ओळखले जाते. शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी व महिला यांच्या समस्या व प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड आपले दंड थोपटून या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे व १००% समाजकारण आणि १००% राजकारण हे ब्रीद घेऊन पुढे जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक, मराठा आरक्षण, ओबीसी संरक्षण आणि सर्वच जातीनिहाय जनगणना हे विषय अग्रस्थानी ठेऊन 'शेतीमालाला भाव व दारूमुक्त गावं' ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करत आहे.

आणि म्हणूनच राजसत्ता काबीज करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आगामी ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुका लढवणार आहे.संभाजी ब्रिगेडची समविचारी पक्षासोबत युती होण्याची शक्यता असल्यामुळे संभाजी ब्रिगेड स्वबळावर किंवा समविचारी पक्षासोबत युती करून निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरणार आहे, आणि त्यासाठी आतापासूनच नगरपरिषदेच्या वेगवेगळ्या भागातील उमेदवारांची संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे अजय गवारगुरु यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments