वाशिम - जिल्हयात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असतांना तांत्रिक तुटवडा दाखवून शेतकर्यांची लुट केल्या जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत खते चढ्या दराने विकल्या जात असल्याची चर्चा असून बोगस खते विक्रीकरीता वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खते विक्रीबाबत शेतकर्यांची होणारी लुट थांबवा अन्यथा कृषि कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात २ जून रोजी कृषि अधिक्षक व कृषी विकास अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, जिल्हयामधील खत विक्रेत्यांकडे सद्यस्थितीत प्राप्तसाठा, विक्री झालेला साठा व शिल्लक असलेला साठा व या खताचे विक्री दर हे दर्शविणारे फलक ठळक अक्षरात माहिती लिहून खत विक्री स्थळाचे प्रथमदर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. याच फलकावर तुटवड्याची माहिती असणे देखील आवश्यक आहे. जेणेकरुन कास्तकारांना आवश्यक माहिती सुलभतेने उपलब्ध होवू शकेल. बाजारांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या खताचा तांत्रिक तुटवडा निर्माण करुनही खते चढ्या दराने, दामपटीने विक्री होत असल्याची चर्चा आहे. तसेच बोगस खते विक्रीकरीता वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरी कृषि विभागाचे तपासणी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकरवी जिल्हयातील व स्थानिक वाशिम शहरातील खतपुरवठा दुकानदारांची तपासणी करण्यात यावी. संबंधितांना आवश्यक सुचना निर्गमित व्हाव्यात व शेतकर्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. निवेदनावर कार्यवाही न झाल्यास मनसेच्या वतीने आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदन देतांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष इंगोले, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, उपाध्यक्ष विठ्ठल राठोड, किशोर गजरे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, वाशीम शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, उपाध्यक्ष गणेश इंगोले, प्रतिक कांबळे, सचिव प्रकाश कवडे, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सीता धंदरे, संगीता चव्हाण, जिल्हा सचिव स्मिता जोशी, शहर संघटक सौ. वंदना अक्कर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
0 Comments