Ticker

6/recent/ticker-posts

पदवीधरांच्या प्रश्नांनाही अधिवेशनात स्थान द्या- श्याम प्रजापती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


- मांडल्या विविध समस्या
अमरावती : विदर्भातील प्रश्न सुटावेत, विदर्भाला न्याय मिळावा म्हणून नागपूर करारानूसार नागपूरला हिवाळी अधिवेशन भरविले जाते. मात्र जवळपास या अधिवेशनातून विदर्भ हद्दपार झालेला असल्याची टीका करत काॅग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम प्रजापती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे पदवीधरांच्या प्रश्नांना अधिवेशनात स्थान देण्याची लक्षवेधी मागणी उपस्थित केली आहे. 
 नागपूरकरारानूसार, विदर्भाच्या सर्वकष विकासावर चर्चा करण्यासाठी, इथले प्रश्न सोडविण्यासाठी विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला भरविले जाते. मात्र आठवडा उलटूनही विदर्भाला न्याय देण्यात सत्ताधारी कमी पडल्याचा मुद्दा श्याम प्रजापती यांनी उपस्थित केला आहे. यावरून सत्ताधाऱ्यांना विदर्भाच्या प्रती किती अनास्था आहे, हे देखील दिसून येत असल्याची टिका श्याम प्रजापती यांनी शिंदे-फडणविस सरकारवर केली आहे.
 दिशा सालीयन प्रकरण, फोन टॅपींग प्रकरण, रश्मी शुक्ला प्रकरण, पुजा चव्हाण प्रकरण या विषयांवर अधिवेशनाच्या पहिल्या आठड्यात चर्चा करण्यात आली. मात्र वाढती बेरोजगारी यासह विविध समस्यांमुळे पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील पदवीधर होरपळून निघत आहेत, त्या प्रश्नांवर मात्र सत्ताधारी ब्र सुद्धा काढत नसल्याचा मुद्दा श्याम प्रजापती यांनी उपस्थित करत पदवीधरांच्या प्रश्नांवरून सरकारचे लक्ष वेधून घेतले. दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या धर्तीवर पदवीधऱ मंत्रालय स्थापन करणे, जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करणे, पदवीधरांच्या हाताला काम मिळेपर्यंत त्यांना निर्वाह भत्ता देणे, यासह त्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक गरजा पुर्ण करणे, स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या विकासासाठी त्यांना अनुदान देणे, उच्च शिक्षणासाठी शासकीय कार्यालयांमध्ये समुपदेशन केंद्र यासह विविध मागण्या काॅग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम प्रजापती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे उपस्थित केल्या आहेत. त्या सरकारने तत्काळ सोडवून पदवीधरांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
--

Post a Comment

0 Comments