वाशिम : शेतकर्यांचे, शेतमजुरांचे प्रश्न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई, ओला दुष्काळ, महापुरुषांचा अवमान, अतिवृष्टी, विजप्रश्न, अनुकंपा, सरकारी शाळा बंदचे धोरण, राज्याबाहेर जाणारे उद्योग, बेरोजगारी आदी मुद्द्यावर नागपूर येथे येत्या १९ डिसेंबरला होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री दत्ता भरणे यांनी ५ डिसेंबर रोजी जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानी घेतलेल्या एका पत्रपरिषदेत दिली. या आक्रोश मोर्चात शेतकरी, विद्यार्थी, युवक, बेरोजगार व सर्व वंचित घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भरणे यांनी केले.
या पत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, पक्षनिरिक्षक डॉ. संजय रोडगे, ्हाजी युसुफ पुंजाणी, सोनाली ठाकुर यांच्यासह जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या आक्रोश मोर्चाच्या आयोजनाबद्दल माहिती देतांना माजी मंत्री दत्ता भरणे म्हणाले की, राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर विराट मोर्चा काढून शिंदे-फडणवीसांना विविध प्रश्नांवरुन लक्ष्य करेल. विरोधी पक्षाचा अधिवेशनाचा पहिल्याच दिवशीचा आक्रमक पवित्रा पाहता संपूर्ण अधिवेशन वादळी ठरेल, यात शंका नाही. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येत आहे. १९ डिसेंबरला अधिवेशन सुरु होईल. गेल्या चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीशी फारक घेतली, शिवसेना फोडली अन् भाजपच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं. या सरकारला आता जवळपास चार महिने उलटून गेलेत. मात्र ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीच्या एकत्रित रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठकही मुंबईत पार पडली आहे. नव्या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज आहे. याचमुळे सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात लाखो लोकांच्या साक्षीने हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांवर विशिष्ट जबाबदारी देण्यात आलेली आहे. या मोर्चात जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ व आजी माजी पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यासह जिल्हयातील शेतकरी, शेतममजूर, बेरोजगार, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेने बहूसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन भरणे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केले.
0 Comments