सोनल पेंढारकर यांना राज्यस्तरीय ‘राजमाता राष्ट्रमाता मातृ सन्मान’ पुरस्कार
मंगरूळपीर
(जि. अमरावती) : अंबाबाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिवरत्न महिला मंडळाच्या सचिव सौ. सोनल प्रशांत पेंढारकर यांना राज्यस्तरीय “राजमाता राष्ट्रमाता मातृ सन्मान” पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी महामानव महात्मा ज्योतिबा फुले जयंती व जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी आमदार सुलभाताई खोडके, डॉ. शुभम नावेकर, इंगळे ताई, संस्थेचे अध्यक्ष सचिनभाऊ चव्हाण, सचिव तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सोनल पेंढारकर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण होती. महिला व पुरुषांनी आपल्या आईला सोबत आणावे, तिच्या कष्टांचे मोल ओळखावे आणि तिचा सन्मान करावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विशेष म्हणजे, सोनल पेंढारकर यांनी आपल्या आईऐवजी सासूला सोबत आणून सन्मान स्वीकारला, यामुळे उपस्थितांमध्ये कौतुकाची भावना निर्माण झाली. सासूचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे उपस्थित महिलांना आणि त्यांच्या मातांना विशेष आनंद झाला.
माधुरीताई चव्हाण यांनी हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पाडला. त्यांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
सोनल पेंढारकर या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्या त्यांच्या पार्लरमध्ये येणाऱ्या महिलांना सतत मार्गदर्शन करतात. तसेच त्या शिवरत्न महिला मंडळाच्या वतीने पंचायत समिती मंगरूळपीर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या समुपदेशन केंद्रात कार्यरत असून त्या मंडळाच्या सचिव आहेत. वर्षभर विविध थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करून महिला मंडळाला पुढे नेण्याचे कार्य त्या यशस्वीपणे करत आहेत. याशिवाय त्या पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
महिलांना समाजात योग्य मान-सन्मान मिळावा, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून, भविष्यात अधिकाधिक महिलांना सन्मानित करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची धडपड आणि सकारात्मक दृष्टिकोन भविष्यात अधिक यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाबाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून सोनल पेंढारकर यांचे कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
0 Comments