Ticker

6/recent/ticker-posts

ATM मध्ये बिघाड करून बँकांना लाखोंनी गंडवणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.


        ATM मशीनद्वारे व्यवहार करत असतांना मशीन मधून रोख रक्कम वितरणाचे वेळी वितरण व्यवस्थेत बिघाड करून पैसे ओढून घेऊन बँकेचा व्यवहार अयशस्वी दर्शवून बँकेच्या वेगवेगळ्या ATM मशीनद्वारे पैसे काढून बँकांना लाखोंचा गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
           
पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अप.क्र.९७९/२२, कलम ४२० भादंवि सहकलम ४३ (ई)(एच), ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये दाखल तक्रारीनुसार दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वाशिम यांच्या अकोला, अमरावती, वाशिम, मानोरा व रिसोड येथे असणाऱ्या ATM मशीनद्वारे व्यवहार करत असतांना ATM मशीन मधून रोख रक्कम वितरणाचे वेळी दोन बोटे डीस्पेन्सिंग शटरमध्ये ठेवून त्या बोटांच्या सहाय्याने वितरण यंत्रणेच्या रोलसीलला आत ढकलून मशीनमध्ये बिघाड केला जात होता. त्यामुळे पैसे काढूनसुद्धा बँकेचा व्यवहार अयशस्वी दर्शवून तब्बल ७.५५ लाखांची रक्कम काढून घेतली होती. कुठलेही धागेदोरे उपलब्ध नसतांना सदर गुन्ह्याचा तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला असता १० वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांशी संलग्न असलेले १९ ATM कार्डद्वारे ७६ वेळा वेगवेगळ्या ATM मशीनमधून व्यवहार करून सदरची रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सदर ATM कार्डशी संबंधित असलेल्या मोबाईल क्रमाकांचा तांत्रिक तपास केला असता सदर मोबाईल क्रमांक एकाच इसमाचे नावाने म्हणजेच अरविंद कुमार अवस्थी, रा.कानपूर, राज्य-उत्तर प्रदेश याचे असल्याचे व त्याने त्याचे नावाचे सीम कार्ड हे वेगवेगळ्या इसमांना देऊन त्या इसमांना ATM मधून पैसे काढण्याकरिता रवाना केले असल्याचे निष्पन्न झाले.
            
सदर तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीच्या संपर्कात असलेले व ATM मशिनच्या CCTV फुटेजमध्ये दिसून आलेल्या आरोपींचा शोध घेतला व १) वैभव ऋषभदेव पाठक, वय २३ वर्षे, २) सत्यम शिवशंकर यादव, वय २३ वर्षे, ३) सौरव मनोज गुप्ता, वय २१ वर्षे व ४) प्रांजल जयनारायण यादव, वय २४ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी ५) अरविंद कुमार अवस्थी याचेवर यापूर्वीदेखील पो.स्टे.कलेक्टरगंज, कानपूर, उत्तरप्रदेश येथे अप.क्र.९४/२२ कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल असून त्यास कानपूर कारागृहातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. बँकांच्या ATM मशीनमध्ये असणाऱ्या या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासंदर्भात बँकांना पत्रव्यवहार करण्यात येणार असून नागरिकांनी अश्या प्रकारचे गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
            सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, नापोकॉ राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रवीण राऊत, राम नागुलकर, प्रवीण शिरसाठ, पोकॉ.निलेश इंगळे, दिगंबर मोरे, अविनाश वाढे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पोकॉ.गोपाल चौधरी, प्रशांत चौधरी नेमणूक सायबर सेल, वाशिम यांच्या तांत्रिक सहाय्याने पार पाडली.



                                                                                 

Post a Comment

0 Comments