Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हाभरात ‘सोशल मिडिया जनजागृती’ ; नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर समाजहितासाठी करण्याचे आवाहन.

    अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन्समधील सर्व सुविधांचा वापर नागरिक करतात. त्यामध्ये सोशल मिडीयाचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होतांना दिसत आहे. सोशल मिडियाचे जसे फायदे दिसून येतात तसेच अलीकडील काही घटनांवरून दुष्परिणाम देखील दिसून येत आहेत. काही समाजकंटक सोशल मिडीयाचा गैरवापर करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
          
त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखा व शहर वाहतूक शाखेमार्फत जिल्हाभरात ‘सोशल मिडिया जनजागृती’ मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत सोशल मिडियाबाबत जनजागृती करणारे ०३ प्रकारचे १५ हजार पत्रके छापून प्रत्येक पो.स्टे.स्तरावर व उपविभागीय स्तरावर, शाखा स्तरावर वाटप करण्यात आले आहेत. 
या मोहिमेअंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बस स्थानके व शहरातील मोक्याच्या ठिकाणी सोशल मिडिया वापराबाबत प्रबोधन करणारे बॅनर्स लावण्यात आले असून विद्यार्थी व नागरिकांना पत्रके वाटप करण्यात येत आहेत. सदर जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये सोशल मिडिया वापर संबंधाने सोशल मिडीयाचा वापर विधायक कामांसाठी व्हावा, समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी नागरिकांची मोलाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यात आली.
 सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल व सर्व पोलीस स्टेशनचे सोशल मिडिया सेल लक्ष ठेवून आहे. जिल्हा पोलीस दलातील सर्व उपविभाग व पोलीस स्टेशन तसेच शाखा स्तरावर २० सोशल मिडिया खात्यांद्वारे ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून सोशल मिडिया अवेअरनेस मोहीम राबविली जात आहे.
     ‘नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर समाजाच्या हितासाठी सामाजिक एकोपा, बंधुभाव कायम राहावा यासाठी करावा. सोशल मिडीयाच्या गैरवापरामुळे सामाजिक शांतता बिघडत असून अश्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी त्यांना आलेल्या भडकाऊ संदेशावर/अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये व तसे अफवा पसरविणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पुढे फॉरवर्ड करू नये.’ असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी जनतेस केले आहे.

       (जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम

Post a Comment

0 Comments