दि.११ जुलै व १२ जुलै २०२३ रोजी मा.पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाची अर्धवार्षिक गुन्हे आढावा बैठक पार पडली. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या
अध्यक्षतेखाली गुन्हे आढावा बैठक पार पडली. सदर गुन्हे आढावा बैठकीला अपर पोलीस अधीक्षक, वाशिम, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी व सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते. वाशिम जिल्हा पोलीस दल जिल्ह्यात दाखल खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबर मारहाण व बलात्कारासारख्या शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात १००% यशस्वी ठरले असून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकावर आहे, हे विशेष.
समाजात गावपातळीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘तंटामुक्त गाव समिती’ व ‘ग्राम सुरक्षा दल’ यांची भूमिका महत्वाची असते. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये ४९३ तंटामुक्त गाव समित्या व ३१३ ग्राम सुरक्षा दल कार्यरत आहेत. संबंधित गावातील बीट जमादार व अंमलदार हे सदर तंटामुक्त गाव समिती व ग्राम सुरक्षा दलाचे पदसिद्ध सदस्य असून त्यांच्यामाध्यमातून गावपातळीवर शांतता प्रस्थापित करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सुरु आहे. मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये तंटामुक्त गाव समिती व ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून त्यांचेमार्फतीने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केले आहे.
वाशिम जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन स्तरावर ‘उत्कृष्ट पोलीस स्टेशन’ निवडण्याकरिता नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार पो.स्टे.कारंजा ग्रामीणला प्रथम क्रमांक, पो.स्टे.कारंजा शहरला द्वितीय क्रमांक तर पो.स्टे.रिसोड ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यावेळी सबंधित पो.स्टे.प्रभारी अधिकारी व गुन्हे तपासामध्ये १३ अधिकारी व ३२ अंमलदार, CCTNS मध्ये उत्कृष्ट काम करणारे ०५ अंमलदार, वाहतूक शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे १ अंमलदार व अपघातग्रस्त युवकास वेळेवर उपचाराकरिता दाखल करून त्याचा जीव वाचविणाऱ्या ०७ अंमलदार अशा एकूण १६ अधिकारी व ४५ अंमलदारांचा सत्कार मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आगामी मोहरम व इतर सण-उत्सवांचा पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत ते सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासंदर्भात सर्व पो.स्टे. व उपविभागांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. अवैध धंद्यांवर जास्तीत जास्त कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर जास्तीत प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात आदेश दिले.
0 Comments