Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर नगर परिषद निवडणूक : आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादीचा विजय, भाजपसाठी चिंतनाची वेळ


मंगरूळपीर | प्रतिनिधी

मंगरूळपीर नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आकड्यांच्या खेळाने राजकीय चित्र पूर्णतः बदलून टाकले. २ डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण १० प्रभागांतील २१ वॉर्डांमध्ये १९,२०८ वैध मते नोंदवली गेली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक परळीकर यांनी ९,०४४ मते (४६.८%) मिळवत अध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. दिलीप रत्नपारखी यांचा ४,४९० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

एआयएमआयएमचा उदय, काँग्रेस-वंचितची पिछेहाट

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एआयएमआयएम या पक्षाने प्रथमच जोरदार उपस्थिती नोंदवत २,५५२ मते मिळवून तिसरे स्थान पटकावले.
एकेकाळी शहराच्या राजकारणात प्रभावी असलेली काँग्रेस पक्षाची मात्र मोठी घसरण झाली असून २००१ साली थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या काँग्रेसच्या बानो रहीम चौधरी यांच्या पक्षाला यावेळी चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

२०१६ मध्ये चमत्कार घडवत अध्यक्षपद काबीज करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला यावेळी पाचव्या क्रमांकावर घसरत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला.

भाजपसाठी विरोधाभासी निकाल

२०१६ मध्ये अल्पमताने पराभूत झालेले भाजप उमेदवार पुरुषोत्तम चितलांगे यांची आठवण ताजी असतानाच, यावेळी भाजपला तब्बल ४,४९० मतांचा फरक सहन करावा लागला. विशेष म्हणजे भाजपचे १० नगरसेवक प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असताना अध्यक्षपदाचा पराभव हा पक्षासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.

आकड्यांमागील राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसने १० प्रभागांत २१ नगरसेवक उमेदवार उभे केले. त्यातील प्रत्येक प्रभागातील सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारांची एकूण मते ७,५६२ इतकी होती. मात्र अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १,४८२ मते अधिक मिळाल्याने ‘क्रॉस वोटिंग’ स्पष्टपणे दिसून आले.

मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक २, ३, ४ आणि ५ मधून राष्ट्रवादीला एकूण ३,३७७ निर्णायक मते मिळाली. हीच मते विजयाची गुरुकिल्ली ठरली.

दुसरीकडे भाजपच्या १८ नगरसेवक उमेदवारांना मिळालेली सर्वाधिक मते एकत्र केली असता ती ५,४९२ इतकी होती, मात्र अध्यक्षपदासाठी डॉ. रत्नपारखी यांना केवळ ४,५५४ मते मिळाली — म्हणजेच नगरसेवक उमेदवारांपेक्षा ९३८ मते कमी.

मुस्लिम मतांचा निर्णायक कौल

या निवडणुकीत एकूण ९,१६५ मुस्लिम मते होती. त्यातील तीन मुस्लिम उमेदवारांना मिळून ५,५३२ मते मिळाली, तर उर्वरित ३,६३३ मते राष्ट्रवादीच्या पारड्यात गेली.
मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होऊ नये म्हणून मुस्लिम समुदायाने रणनीतीपूर्वक राष्ट्रवादीला कौल दिल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.

ठाकरे परिवाराची भूमिका निर्णायक

माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रवादीला सुमारे १,२०० हून अधिक मते मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मागील निवडणुकीतील सुमारे ४,५०० मतांच्या तुलनेत यावेळी राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली.

तयारी विरुद्ध विस्कळीतपणा

एक वर्षापासून सुरू असलेली राष्ट्रवादीची तयारी, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, मागील दोन पराभवांमुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि परळीकर परिवाराचा ४५ वर्षांचा राजकीय अनुभव — या सर्व घटकांनी विजय खेचून आणला.

याउलट भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजी, अंतर्गत विरोध, काही पदाधिकाऱ्यांचे विरोधी भूमिकेत काम करणे आणि राजकीय डावपेच ओळखण्यात अपयश या कारणांनी पराभव ओढवला.

तरीही भाजप सत्तेत सहभागी होणार

२१ पैकी १० भाजप व १ मित्र पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे उपाध्यक्षपद मिळवून सत्तेत सहभागी होण्याची संधी भाजपकडे आहे.

राजकीय गणिते बदलली असली तरी मंगरूळपीरच्या राजकारणात पुढील घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


लेखन : अन्नाभाऊ गोवर्धन चौधरी
चेहेल, मंगरूळपीर, जि. वाशीम
📞 ९९२२०१०४०६



Post a Comment

0 Comments