वाशिम - राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या अपुर्ण व अर्धवट बांधकामामुळे वाशिम हिंगोली महामार्गावरील सायखेडानजीक असलेल्या महामार्गावर झालेल्या अपघातात एका निरपराध व्यक्तीचा जीव केला. या अपघातास व मृत्युस कारणीभूत असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीकांत व्ही. डागे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह टोल प्लाझावर सर्व सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने शनिवार, २८ सप्टेंबर रोजी तोंडगाव टोल प्लाझासमोर रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
याबाबत यवतमाळ वाशिम लोकसभा वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात तसेच मनसे जिल्हाध्यक्ष राजु पाटील किडसे, शहराध्यक्ष रवि वानखेडे, कामगार सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश फड, वाशिम मंगरुळनाथ वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कढणे, शहराध्यक्ष उमेश टोलमारे, सहचिटणीस देविदास जैताडे, मालेगाव शहराध्यक्ष आतिश डहाळे, महाराष्ट्र सैनिक गणेश चव्हाळे, नरेंद्र भोयर आदींच्या उपस्थितीत गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार वाहन धारकांकडून टोल वसुल करत असतांना सर्व सुविधा पुरविण्याचेही नियम आहेत. मात्र नियुक्त केलेल्या कंपनीकडून या नियमांचे उल्लंघन होत असून सर्रास टोल वसुली केली जात आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. २४ तास रुग्णवाहीका, टोईंग व्हॅन, पिवळ्या रंगाची पट्टी, सर्विस रोडवरील पर्यायी मार्ग, महिला व पुरुषांसाठी मोफत स्वच्छ शौचालय, मोफत वाहनतळ, स्तनपानगृह, प्रथमोपचार केंद्र, सुविधांचे फलक, कर्मचारी व कामगार नियमावली, कर्मचार्यांना मान्यताप्राप्त गणवेश, ओळखपत्र व चारित्र्य पडताळणीचा दाखला, प्रशिक्षीत व स्थानिक कामगारास प्राधान्य आदी सुविधांची वाणवा आहे. यासोबतच नजीकचा सायखेडा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अपुर्ण असुन तरीही टोल वसुली सुरुच आहे. या अपुर्ण व अर्धवट रस्त्यामुळे २२ सप्टेंबर रोजी या ठिकाणी मिनीट्रक व कारचा अपघात होवून या अपघातात गणेश लुटे नांदेड या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला. रस्ता दुरुस्तीत अक्षम्य हलगर्जीपणा व दुर्लक्ष केल्यामुळेच एका निष्पाप नागरीकाचा जीव गेला असून या अपघातास कारणीभूत असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीकांत व्ही. डागे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी मनसे वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. तसेच आठ दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात येईल असेही निवेदनात नमूद केले आहे.
0 Comments