दहशत नव्हे, तर आदर होता नजरेत त्यांच्यासाठी, सत्ता हादरायची, जेव्हा आवाज उठायचा अन्यायाविरुद्ध त्यांच्या ओठांवरी.
केवळ नेता नव्हते, तर जनतेच्या हृदयातली धग होते, प्रकाश दादांचे स्मरण म्हणजे चेतनेची जळती मशाल होते."
कारंजा नगरी — ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध अशी ही नगरी, जिथे नृसिंह महाराज गुरु मंदिर हे श्रद्धेचं आणि आध्यात्मिकतेचं केंद्रस्थान मानलं जातं. या नगरीतच साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य आहे, असं मानलं जातं. आणि या नगरीच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकनेते स्वर्गीय श्री. प्रकाश दादा उत्तमरावजी डहाके.
दादांचं नेतृत्व हे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी नव्हतं, ते होतं लोकांच्या मनं जिंकण्यासाठी.
त्यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करत असताना क्षेत्रातील प्रश्नांची खोलात जाऊन समजूत घेतली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या.
त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती या नात्याने शेतकऱ्यांसाठी झपाटून काम करण्याचा काळ हा सर्वदूर परिचित आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, बाजारव्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी त्यांनी संघर्ष केला. विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि युवकांमध्ये संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी अनेक सकारात्मक पावलं उचलली.
कारंजा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक , शहरातील पुरातन काळाच्या वेशी , शहराचे सुशुभीकरण परिसरात आणि आसपासच्या विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी केवळ विकासावर भर दिला नाही, तर श्रद्धास्थळांची अस्मिता जपण्याची दूरदृष्टीही ठेवली.
त्यांचं बोलणं मधाळ, पण निर्णय स्पष्ट आणि ठाम असायचे. सामान्य माणूस त्यांच्यात आपल्याला पाहायचा, कारण दादा कधीही आपलंपण सोडत नसत. त्यांनी दिलेल्या अनेक योजना, सन्मान, शैक्षणिक संधी आजही त्यांची आठवण करून देतात.
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपूर्ण कारंजा नगरी त्यांना साष्टांग नमस्कार करते. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रेरणादायी ठेवा आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा हीच खरी श्रद्धांजली.
दादा, तुमचं ठाम बोलणं, निडर उभं राहणं आणि झुंजण्याची प्रेरणा आम्हाला पुढे चालण्यासाठी मार्गदर्शन करत राहील. तुमचं स्मरण म्हणजे आमचं शौर्य आहे. कोटी कोटी प्रणाम !
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments