आई थकली... पण थांबली नाही!
यशाच्या उंबरठ्यावर लेकरं थांबली, आईच्या कष्टांना हरवतायत का?
वाशिम
“थकलोय, हारलोय...” असं म्हणणारी आजची तरुण पिढी आपल्या मागे उभी असलेल्या त्या महान व्यक्तीला — आईला — कधी पाहत नाही का? जिला आयुष्यभर संघर्षाचा श्वास घ्यावा लागला, पण कधी तक्रार केली नाही.
आई... जिला दिवसाला दोन वेळचं अन्न मिळालं नाही, पण लेकरांना उपाशी झोपू दिलं नाही. स्वतः तापाने फणफणत असतानाही आपल्या लेकरासाठी रात्रभर जागी राहिली. गरिबीशी झुंज दिली, परिस्थितीशी संघर्ष केला आणि घराचं दार उघडं ठेऊन संस्कारांची दीपमाळ पेटवत राहिली.
तीने स्वतःचं आयुष्य झिजवलं — फक्त लेकरांच्या भविष्याला उजाळा मिळावा म्हणून. ती हारली नाही — नाही उपेक्षेसमोर, नाही अपमानासमोर, नाही दारिद्र्याच्या झटक्यांसमोर.
पण आज तिचीच मुलं म्हणतायत, “झालय, कंटालोय, सोडलं...”
हा पराभव कोणाचा आहे? त्यांच्या यशाचा नाही, त्यांच्या आईच्या संघर्षाचा आहे. ती जिच्या घामाने त्यांना उभं केलं, तिच्या स्वप्नांना हरवून बसणं — हे तिच्या त्यागाचं अपमान करणं नाही का?
असंख्य मातांनी आपल्या लेकरांसाठी स्वतःला झिजवलं. शेतात राबत राबत, उंबरठ्यावर भाकर शिजवत, अंगणात शिक्षणाचं दिवा पेटवत आईने मुलांना मोठं केलं. आज त्या मातांचा संघर्ष विसरून लेकरांनी पाय मागं घेतले, तर ती जिंकल्यासारखी वाटेल का?
आई कधीच थांबली नाही — मग लेकरांनी थांबावं का?
आई कधीच हरली नाही — मग आपण का हारावं?
माय म्हणजे पहाटेचं कोवळं ऊन,
जिथं उमलतं आयुष्याचं पहिलं सोनं।
तिच्या सावलीत चालायला शिकतो आपण,
आणि तिच्याच हृदयात जगण्याला अर्थ गवसतो।
तिचं हास्य म्हणजे आशीर्वाद,
तिची माया म्हणजे गंधहीन पण मनाला वेडावणारा सुगंध।
ती थकत नाही, तरी रोज थकव्याला हरवते,
आपल्यासाठी झिजणारी, पण कधीच न गमावणारी प्रेरणा देते।
ती असते तेव्हा घरात देव असतो,
ती नसली तर भिंती असूनही घर उरलेलं नसतं।
माय म्हणजे प्रेमाचं जग, निःस्वार्थपणाचं खऱ्या अर्थाने उदाहरण,
तीच आपली पहिली गुरु, पहिली ओळख, आणि पहिलं स्तोत्र।
वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments