Ticker

6/recent/ticker-posts

"स्वाभिमानाच्या बाजारात माणुसकी हरवतेय!" – समाजात वाढणाऱ्या असंवेदनशीलतेवर कठोर प्रश्न : सुधाकर चौधरी


आजच्या जगात माणसाची किंमत काय ठरवते? त्याचा स्वाभिमान, त्याची मूल्यं की त्याची बाजारातली किंमत? “नको त्या पायरीवर हा देह खुळा झुकला जातो” – या ओळीतून व्यक्त होणारी वेदना केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या अधःपतनाची कहाणी सांगते.

आज माणसाने माणसाला ओळखणं विसरलंय. फसवेगिरी, स्वार्थ आणि बेगडी नाती याच्या सावलीत खरी माणुसकी कुठेतरी हरवतेय. "माणूस ओळखायला इथे माणूसच चुकला जातो" हे विधान इतकं जळजळीत सत्य आहे की प्रत्येकाने यावर विचार करायला हवा.

स्वाभिमानही आता विक्रीला?

स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढणं ही एक काळाची गरज होती. पण "ही विकण्याची गोष्ट नाही मुळात, तरी इथे स्वाभिमान विकला जातो" अशी स्थिती निर्माण झाली आहे. गरिबी, राजकीय दडपशाही, सामाजिक अन्याय आणि आर्थिक विषमता यामुळे अनेकांना आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागते. आणि हीच तडजोड पुढे जाऊन माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते.

माणुसकीला मुकणारा माणूस

शेवटी, "होऊन निर्लज्य परिस्थिती पुढे माणूस माणुसकीलाच मुकला जातो" या ओळीतून समाजातील एक अत्यंत भीषण वास्तव समोर येतं – जेव्हा हालअपेष्टांनी गांजलेला माणूस इतका तोडून जातो की त्याचं माणूसपणही हरवून बसतो.

समाजासाठी एक प्रश्नचिन्ह

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो – आपण खरंच प्रगती करत आहोत का? की केवळ भौतिक सुखांच्या मोहात आपली माणुसकी, संवेदनशीलता आणि एकत्रित मूल्यं गमावत चाललोय?

वेळ अजून गेलेली नाही. माणुसकीच्या वाटेवर परत जाणं शक्य आहे – फक्त हृदय जागं ठेवायला हवं.

आज आपण इतकं पुढं आलो आहोत की तंत्रज्ञान, पैसे, यश सगळं मिळालंय… पण तरीही काहीतरी हरवतंय — आणि ते म्हणजे खरा माणूस.

"माणूस ओळखायला इथे माणूसच चुकतोय…" ही ओळ आता फक्त कविता नाही उरलेली. ती एक आरसा आहे — आपल्याच चेहऱ्यावर धरलेला.
कधी काळी डोळ्यातलं पाणी बघून आपल्याला समजणारे लोक होते. आज डोळ्यांतलं खोटं हसू बघूनही लोक छान वाटतंय म्हणतात.

स्वाभिमान? तो तर आता एक सौदा झालाय.
कधी नोकरीसाठी, कधी संबंध टिकवण्यासाठी, कधी समाजात मान मिळवण्यासाठी — आपण आपली किंमत स्वतःच लावायला शिकून गेलो आहोत.
"ही विकण्याची गोष्ट नाही मुळात…" असं वाटत असतानाच एखादं ‘ऑफर’ येतं आणि आपण तडजोड करतो.

कधीकधी प्रश्न पडतो — आपण खरंच जगत आहोत की फक्त निभावत आहोत?

खोटं हसू, बनावट शब्द, आणि मुखवटे — या सगळ्यांच्या मागे आपला खरा चेहरा हरवतोय. आणि जेव्हा दुसऱ्याला ओळखायचं वेळ येते, तेव्हा आपण चुकतो — कारण आपण स्वतःलाच विसरलोय.


या सगळ्या गर्दीत, आज एक शांत प्रश्न मनात घुमतो आहे —
आपण अजून माणूस आहोत का? की केवळ माणसासारखी दिसणारी सावली?

आपला सुधाकर चौधरी

Post a Comment

0 Comments