साखरखेर्ड्याच्या परमपूज्य सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे दिव्य सान्निध्य
वाशीम – बाराव्या शतकात जगातील पहिली लोकशाही संसद स्थापन करून समतेचा संदेश देणारे, लिंगायत पंथाचे महान समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९४ व्या जयंतीनिमित्त शहरात भव्य आणि दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
ही शोभायात्रा महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने दिनांक १ मे रोजी साखरखेर्डा येथील परमपूज्य श्री सद्गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाली. राम मंदिर येथून सायंकाळी शोभायात्रेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
महिलांनी पारंपरिक भगव्या साड्यांमध्ये सजून, श्रद्धाभावाने आणि आनंदाने सहभाग नोंदवला. शोभायात्रेचा मार्ग राम मंदिर, बालू चौक, सुभाष चौक, गुरुवार बाजार, जुनी नगर परिषद, रजनी चौक मार्गे चिंतामणेश्वर मठ, शुक्रवार पेठ येथे समारोपात आला.
यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे काटा, ब्रम्हा आणि सनगाव येथील भजनी मंडळांनी भक्तिरसात न्हालेल्या भजनांच्या गजरात सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांचे सूर, फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी आणि रस्त्यांवर काढलेल्या रांगोळ्यांनी शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
प्रमोद भुकणे व प्रशांत भुकणे यांनी भाविकांसाठी शरबताचे वाटप करून सेवा दिली. यात्रा संपन्न होत असताना परमपूज्य महाराजांची अश्वारूढ मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली. महिलांनी पूजाअर्चा करून महाराजांचे आशीर्वाद घेतले.
या यशस्वी आयोजनामध्ये डॉ. अर्चना मेहकरकर यांच्या अध्यक्षतेखालील महोत्सव समितीने अतिशय नेटके आणि समर्पित नियोजन केले. संपूर्ण समाजबांधवांनी एकत्र येत अथक परिश्रम घेतले
0 Comments