दारव्हा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या कृषी महाविद्यालय, दारव्हा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात सातेफळ (ता. नेर) येथील शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
कार्यक्रमांतर्गत कृषिदूत प्रथमेश ठाकरे, आदित्य तुरक, अमर वाहादुळे, ऋषीकेश येवतकर, ओम रोकडे आणि दर्शन झोड यांनी गावातील शेतकरी व ग्रामस्थांना बियाण्यांचे प्रकार, त्यावरील टॅग्स आणि त्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. बियाण्यांवरील टॅगची ओळख करून देणे आणि खरेदी करताना त्याची शास्त्रशुद्ध निवड करणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असल्याचे कृषिदूतांनी स्पष्ट केले.
त्यावेळी बियाण्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आले :
- मूलभूत बियाणे (Breeder Seed) : आय.ए.आर. व आय.सी.ए.आर. संस्थांद्वारे विकसित होणारे हे बियाणे जैविक शुद्धतेच्या दृष्टीने १००% असते. यावर कोणताही टॅग नसतो.
- पैदासकार बियाणे (Foundation Seed) : मूलभूत बियाण्यांपासून निर्माण होणारे हे बियाणेही १००% जैविक शुद्धतेचे असून त्यावर गोल्डन यलो टॅग असतो.
- पायाभूत बियाणे (Registered/Certified-I) : पैदासकार बियाण्यांपासून तयार केले जाणारे हे बियाणे ९९.५% जैविक शुद्धतेचे असून त्यावर पांढऱ्या रंगाचा टॅग असतो.
- प्रमाणित बियाणे (Certified Seed) : पायाभूत बियाण्यांवर आधारित असून ९९% जैविक शुद्धतेचे असते. यावर निळ्या रंगाचा टॅग असतो.
- सत्यप्रत बियाणे (Truthfully Labelled Seed) : प्रमाणित बियाण्यांवर आधारित असून त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हे बियाणे खाजगी कंपन्यांकडून विकले जात असून यावर कंपनीचा लेबल असतो.
यावेळी कृषिदूतांनी स्पष्ट केले की, मूलभूत व पैदासकार बियाण्यांचे उत्पादन अल्प प्रमाणात होते. तर पायाभूत, प्रमाणित व सत्यप्रत बियाणे हे मोठ्या प्रमाणावर तयार केले जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे खरेदी करताना टॅगची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा फसवणुकीची शक्यता असते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य पंकज खाडे सर, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. अक्षय लुंगे सर आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव देशमुख सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
शेतीसाठी योग्य बियाण्याची निवड हीच उत्पादनवाढीची गुरुकिल्ली असल्याने, अशा उपक्रमांद्वारे ज्ञानाचा प्रसार होणे काळाची गरज ठरत आहे.
0 Comments