"वृद्ध कलावंतांचा सन्मान हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे – शासनाने तो जपायलाच हवा!" – संजय कडोळे
//वाशिम सुधाकर चौधरी//
"आयुष्यभर लोककलाच जीवन समजून, समाजजागृती, जनप्रबोधन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांतून स्वतःचं कलेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या, पण आजच्या वार्धक्यात उपेक्षेच्या छायेत असलेल्या वयोवृद्ध कलावंतांसाठी सुरू असलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजने’च्या प्रस्ताव स्वीकृतीसाठीची मुदत ३१ जुलै २०२५ ऐवजी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवावी," अशी ठाम आणि ज्वलंत मागणी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे केली आहे.
या मागणीमागचे संदर्भ अधिक बोलके आहेत. हजारो लोककलावंतांनी आयुष्यभर गावा-खेड्यांतून लोकनाट्य, भारूड, कीर्तन, पोवाडे, गोंधळ आदी कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. पण आज त्यांचे वार्धक्य हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत गेले पाहिजे का? त्यांच्या उपचारांपासून ते उदरनिर्वाहापर्यंत आधार देणारी ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते, पण अडथळ्यांची शर्यत अजूनही थांबलेली नाही.
डिजिटल अर्जांची सक्ती, त्यातही अपुऱ्या सुविधा – ग्रामीण कलाकार भरकटले!
राज्य शासनाने पारदर्शकतेच्या नावाखाली योजनेचा अर्ज प्रक्रियेचा ऑनलाईन मार्ग स्वीकारला, मात्र त्यामुळे खऱ्या गरजवंत लोककलावंतांना प्रत्यक्षात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे – अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आणि भारत सरकारच्या नोटरीकडून प्रतिज्ञापत्र – ही सर्व प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळवण्यासाठी किमान आठ दिवस लागतात. त्यात पावसामुळे इंटरनेट आणि वाहतुकीच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.
“खेड्यापाड्यातला खरा कलाकार ऑनलाईनला बिचारा”
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कलाकार वयोवृद्ध असूनही तहानभूक विसरून कागदपत्रांच्या मागे फिरत आहेत. संजय कडोळे यांनी सरकारकडून थेट सवाल केला आहे – “ही योजना खऱ्या कलाकारांसाठीच आहे ना? मग त्यांच्यासाठी सोयीची करणार की अडचणीची?”
प्रचाराचा अभाव – योजनाच झाकली गेली!
शासनाने योजनेबाबत पुरेसा प्रचार न केल्याने अनेक पात्र कलावंतांपर्यंत माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे सध्या अंतिम तारखेला केवळ काही निवडक आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज लोकांचाच अर्ज पोहोचत आहे. यामुळे हजारो वर्षानुवर्षे कलेत रमलेल्या पण इंटरनेटच्या जाळ्याबाहेर असलेल्या कलावंतांचा अन्यायकारक वगळ होणार आहे.
म्हणूनच संजय कडोळे यांची ठाम मागणी – "मुदत वाढवा, न्याय द्या!"
या पार्श्वभूमीवर संजय कडोळे यांनी केलेली मागणी ही केवळ निवेदनापुरती मर्यादित नाही, तर ही एका पूर्ण पिढीच्या सन्मानाची आणि आधाराची हाक आहे. शासनाने सद्यस्थितीचा संवेदनशीलतेने विचार करून तात्काळ योजनेची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवावी, जेणेकरून खऱ्या पात्र कलाकारांचा सहभाग आणि सन्मान दोन्ही सुनिश्चित होईल, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
0 Comments