वाशिम प्रतिनिधी
सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत 26 जुलै रोजी ‘कारगिल विजय दिवस’ उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लढत देत लडाखच्या कारगिल भागातील उंच शिखरांवर पुन्हा आपला ताबा मिळवला. त्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
या पार्श्वभूमीवर शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी भारतीय सैन्याच्या शौर्यगाथा, त्याग आणि बलिदानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सी. एम. ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, तर मार्गदर्शक म्हणून प्रा. पी. व्ही. गाडेकर, पी. व्ही. पवळ, ए. ए. गवळी, बी. डी. सोनटक्के, एन. ए. पडघान, रामचंद्र ठाकरे, अब्दुल गौरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी शाळेतील पार्थ वाघमारे, सोहम कव्हर, वैष्णव दवणे, संस्कार घुगे या विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिनाविषयी मनोगत मांडून उपस्थितांची मने जिंकली.
मार्गदर्शक वक्त्यांनी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे प्रेरणादायी किस्से सांगत विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती देत त्यातून बोध घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दहावीच्या दुर्गेश धाडवे व सिद्धांत ठोके यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदित्य राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन वर्गशिक्षक व्ही. एम. जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ व प्रताप पी. पोळकट यांनी दिली.
0 Comments