वाशिम तालुका प्रतिनिधी :–
लायन्स क्लब वाशिमतर्फे दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त “उत्सव आजादी का” हा देशभक्तीपर नृत्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात येतो. या स्पर्धेत सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या नृत्यप्रयोगाची प्रेक्षकांना नेहमीच उत्कंठा असते.
यंदाही सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, जोशपूर्ण आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेला बहारदार नृत्यप्रयोग सादर करून प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या या कलाकारीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला.
या जोशपूर्ण नृत्याच्या जोरावर सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी “उत्सव आजादी का” जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी कामगिरीबद्दल शाळेत आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी विजयी चमूचे तसेच कोच आदर्श शिक्षक पी. व्ही. पवळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या वेळी शाळेचे मार्गदर्शक डी. एन. पाटील, आर्किटेक्ट मुंडेवाले, प्राचार्य सी. एम. ठाकरे, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, जी. टी. मोरे, एम. पी. राऊत, गणेश भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी दिली.
0 Comments