पटण्याच्या गर्दनीबागेत आजपासून सुरू झालेल्या ऐतिहासिक धरना आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातूनही जोरदार पाठिंबा मिळाला आहे. पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि लोक आंदोलन न्यास रालेगणसिद्धीच्या कार्याध्यक्षा आदरणीय कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या भविष्याचा लढा छेडण्यात आला आहे.
आज सकाळी अकरा वाजता गर्दनीबागेत जनतेच्या उसळलेल्या लाटेसमोर प्रशासन हादरले. संयुक्त विकास समितीची स्थापना, मतदारयादीतील अन्याय्य वगळण्यांची चौकशी आणि लोकशाही प्रक्रियेत न्याय व पारदर्शकता या ठळक मागण्यांसाठी सुरू झालेलं हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत अखंड सुरू राहणार आहे.
याच निर्णायक लढ्याला वाशिम जिल्ह्यातून लोक आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. “हा संघर्ष केवळ बिहारपुरता मर्यादित नसून, संपूर्ण देशातील लोकशाही हक्क व जनसन्मानाच्या लढाईचं प्रतीक आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या आंदोलनाच्या पाठीशी आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
गर्दनीबाग हा जनआंदोलनांचा ऐतिहासिक केंद्रबिंदू आहे. आज तिथे लोकशक्तीच्या प्रचंड लाटेने थरथराट निर्माण केला आहे. आंदोलनकर्त्यांचा इशारा स्पष्ट आहे – “मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील!”
अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने आणि कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं हे आंदोलन आज बिहारच्या सन्मान, विकास आणि लोकशाही हक्कांसाठीची निर्णायक लढाई ठरत आहे – आणि या लढ्यात वाशिम जिल्हा खांद्याला खांदा लावून उभा आहे!
0 Comments