पटना
( वृत्त संकलन सुधाकर चौधरी )
राष्ट्रीय लोक आंदोलनाच्या कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं अनिश्चितकालीन धरना आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्र होत चाललं आहे. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी “व्यवस्था परिवर्तन के लिए लढाई! जनता की एकता – जिंदाबाद! हमारा हक – हमारा अधिकार!” अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनाच्या ठळक मागण्या :
१) बिहारच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय, तज्ज्ञ आणि जनप्रतिनिधींना सामावून घेणारी संयुक्त विकास समिती तातडीने स्थापन करावी.
२) (SIR) प्रक्रियेत हटवलेल्या नावांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष आयोगाची स्थापना करावी. या आयोगात विरोधी पक्षांनाही प्रतिनिधित्व द्यावे, जेणेकरून तपास प्रक्रिया पारदर्शक व निःपक्षपाती राहील.
३) आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा व अन्यायाने वगळलेली नावे तातडीने पुनः समाविष्ट करावी.
आंदोलनकर्त्यांचा निर्धार :
आंदोलनाचे ट्रस्टी सुखदेवसिंह विक्र यांनी ठाम शब्दांत सांगितलं –
“ही लढाई केवळ एका राज्याच्या विकासासाठी नाही, तर संपूर्ण देशातील लोकशाही व नागरिक हक्कांच्या रक्षणासाठी आहे. हक्क हिरावले जाणार नाहीत, अन्याय सहन केला जाणार नाही.”
धरना स्थळी दिवसभर जागरूक नागरिकांची गर्दी वाढत राहिली. युवकांनी हातात फलक घेऊन “नागरिक हक्कांवर गदा आली, तर लढा उभा करूच”, “जनता एकजूट – अन्यायाला विरोध” अशा घोषणा दिल्या. महिलांनीही सक्रिय सहभाग नोंदवत आंदोलनाला नवी उर्जा दिली.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनशैलीची झलक
या आंदोलनाची प्रेरणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अहिंसक, लोकशाहीवादी आंदोलनातून घेतली असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी जसा जनआंदोलनाचा प्रभावी मंच उभा केला, तसाच लोकहक्कांसाठी, विकासासाठी आणि पारदर्शक शासनासाठी हा संघर्ष असल्याचे कल्पनाताई इनामदार यांनी जाहीर केले.
पटना येथील कार्यकर्त्यांसह देशभरातील लोक एकवटत आहेत. बिहारातील प्रश्नांवरून सुरू झालेले हे आंदोलन लवकरच सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडीत राष्ट्रीय प्रश्नांचे रूप घेईल, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनावर वाढतं दडपण
धरना आंदोलनाचा दुसरा दिवस संपता-संपता वातावरण अधिक तापलेले दिसले. शासन-प्रशासन या मागण्यांकडे कशा दृष्टीने पाहते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कार्यकर्त्यांचा इशारा स्पष्ट आहे – “मागण्या पूर्ण न झाल्यास हा संघर्ष आणखी तीव्र होईल.”
0 Comments