Ticker

6/recent/ticker-posts

🌾 शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे शासन बहिरे – अतिवृष्टीत पिकं वाहून गेली, मदतीशिवाय शेतकरी उघडे पडले!



मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) –


तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यांसह इतर पिके पूर्णतः नष्ट झाली असून अनेक गावे अजूनही पाण्याखालीच आहेत. जमिनीची सुपीक माती वाहून गेल्याने शेतं ओसाड पडली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या घरात धान्याचा दाणा नाही आणि ओसरीवर उपासमारीचे सावट आहे.

या बिकट परिस्थितीवर शिवसेना युवा सेनेतर्फे मंगरूळपीर तहसीलदारांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. तालुकाप्रमुख मनीष पाटील गहुले यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात शासनाला ठणकावून सांगण्यात आले की –

  • तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करावेत.
  • मंगरूळपीर तालुक्याला ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे.
  • शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करून वितरित करावी.
  • कर्जमाफी व व्याजमाफीवर त्वरित निर्णय घ्यावा.
  • खरडून गेलेल्या जमिनी पेरणीयोग्य करण्यासाठी विशेष अनुदानाची तरतूद करावी.

👉 शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. बँका, पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून उसने घेतलेल्या पैशावर केली गेलेली पेरणी या पावसाने वाहून नेली. आता शासन जर हातावर हात धरून बसले तर शेतकरी आत्महत्येकडे ढकलला जाईल, याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना शिवसेना युवा सेनेचे सचिन पाटील महाकाळ, मंगेश सोळंके, बजरंग रघुवंशी, गणेश बजाज, दिनकर जाधव, शहर प्रमुख सुनील कुर्वे, जतिन सोनोने, विनायक पाटील, लखण ठाकूर, चेतन ठाकूर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि मंत्रालयात मात्र गप्पांची मैफल रंगली आहे. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारू,” असा इशारा शिवसेना युवा सेनेने दिला आहे.


Post a Comment

0 Comments