मंगरूळपीर( सुधाकर चौधरी)
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या सततच्या आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भयावह पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक प्रचंड संकटात सापडले आहेत. नद्यांना पूर आल्याने गावोगाव पाणी शिरले, हजारो हेक्टर शेती जलमय झाली, कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आणि अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला.
पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली भारतच्या वतीने सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे (समाजसेविका) यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे तातडीने पंचनामे करून संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या सोबत लीलाबाई कक्कने, जया गरी, शुभांगी जाधव, पुप्पा जाधव, संगीता जाधव, उषा जाधव, ईश्वरी कड, वशाली शिंदे, संगीता रायते, अर्चना गौरी, शारदा जाधव यांच्यासह इतर महिला सामाजिक कार्यकर्त्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
पूर व पावसामुळे झालेलं नुकसान – एक झलक
- राज्यातील २९ जिल्ह्यांतील १४.४४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित
- पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, भात व इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान
- घर, जनावरे व घरगुती साहित्य पाण्याखाली
- काही ठिकाणी जीवितहानी आणि जनावरांचे मृत्यू
- नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- सर्व बाधित गावांमध्ये तातडीने पंचनामे करावेत.
- पंचनाम्याची माहिती ग्रामपातळीवर पारदर्शकपणे जाहीर करावी.
- शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची शंभर टक्के भरपाई थेट बँक खात्यात जमा करावी.
- घरमालमत्ता, जनावरे, साहित्याच्या नुकसानीसाठी स्वतंत्र मदत योजना जाहीर करावी.
- मदत वितरण प्रक्रिया पारदर्शक असावी, पात्र यादी सार्वजनिक करावी.
- नागरिकांसाठी तात्काळ निवास, अन्न, पाणी, औषधे यांची व्यवस्था करावी.
- भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, नाल्यांचे खोलीकरण, जलव्यवस्थापनावर लक्ष द्यावे.
- फक्त नांदेड जिल्ह्यात ७.७४ लाख शेतकरी बाधित
केवळ नांदेड जिल्ह्यात शासनाने ५५३.४८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी इतर जिल्ह्यांतील बाधितांना अद्याप मदतीचा लाभ मिळालेला नाही. अन्य जिल्ह्यांतील हजारो शेतकरी अजूनही पंचनाम्याची आणि भरपाईची वाट पाहत आहेत.
शासनाकडे विनंती – तातडीने पावले उचला
शेतकरी व सामान्य जनतेवर ओढावलेल्या या नैसर्गिक संकटाची दखल घेऊन, शासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्थलांतर व सामाजिक अस्थिरतेचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
"शेतकरी जगला तरच देश जगेल" – शेतकऱ्यांची हाक
या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "शेतकरी हा देशाचा कणा आहे. आज त्याच्या हातात उभी पिकं वाहून गेली आहेत. त्याला दिलासा दिला नाही, तर उद्याचं भवितव्य अधिक अंधारमय होईल."
0 Comments