मंगरूळपीर : शहरातील हुडको कॉलनी परिसर मंगलवार भक्तिरसाने न्हाऊन निघाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील पंधराव्या अध्यायातील ओवीवर आधारित भव्य सत्संगाचे आयोजन श्रीराम मिटकरी यांच्या निवासस्थानी करण्यात आले. भक्त, अभ्यासक आणि सत्संगी मंडळींच्या उपस्थितीने हा अध्यात्मिक सोहळा उत्साहात पार पडला.
सत्संगात “साडे पंधरा मिसळावे, साडे पंधरा ची हो आवे...” या माऊलींच्या ओवीचे अर्थ, संकेत आणि अध्यात्मिक संदेश यांवर मान्यवर अभ्यासकांनी सखोल विवेचन केले. शांत, प्रसन्न आणि ज्ञानमय वातावरणात भाविकांनी मन:पूर्वक चिंतनाचा लाभ घेतला.
संस्कृत श्लोक व भावार्थाने भारावले वातावरण
सत्संगात पुढे—
“यथा सुवर्णं स्वकर्मणा शुद्धिम् उपैति,
तथा भक्तोऽपि तपश्चर्यया परमेश्वरं समीयात्।”
हा संस्कृत श्लोक सादर करण्यात आला.
भावार्थ :
परमेश्वर शुद्ध सोने आहे आणि भक्तही सोनेच आहे; परंतु त्यातील मलिनत्व नष्ट झाल्याशिवाय भक्ताचे परमेश्वराशी एकरूपत्व साध्य होत नाही. जसे सोने भट्टीत तापून शुद्ध होते, तसेच भक्ती ही साधना भक्ताला निर्मळ, पारदर्शक आणि भगवंताच्या एकसंधतेकडे नेणारी प्रक्रिया आहे, असा प्रभावी संदेश अभ्यासकांनी दिला.
दिग्गज अभ्यासकांनी सजला सत्संग
या कार्यक्रमाला शहर व परिसरातील अनेक ज्येष्ठ अभ्यासक, कीर्तनकार व सत्संगी मंडळींची उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांमध्ये—
प्रेमसिंगजी राठोड, अण्णासाहेब पाटील, शेरे साहेब, प्रभाकरराव गावंडे,
ह. भ. प. प्रकाश राजगुरे, जामदरकर महाराज, गोपीचंद महाराज,
विठ्ठलराव पाटील (धामणी), डॉ. सूर्यवंशी, योगशिक्षक धनवे,
विलास पवार, बादल महाराज, आनंद अगमे यांचा समावेश होता.
अनेक भक्तांनी सत्संगात हजेरी लावून अध्यात्मिक वचनांचा लाभ घेतला.
पसायदान, आरती आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता
सत्संगाच्या शेवटी सर्व भाविकांनी सामूहिकरित्या पसायदान घेत वातावरण अधिक पवित्र झाले. त्यानंतर सुमधुर आरती झाली.
कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेत, सत्संग अधिक मंगलमय झाला.
या सत्संगाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सत्संगी बांधव, अभ्यासक आणि मंडळींचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
0 Comments