Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेत नूतन व्यवहारे ताईंचे घवघवीत यश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


मंगरूळपीर सुधाकर चौधरी :


अमरावती येथे जिल्हा परिषद शाळा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेत माँ सरस्वती संगीत विद्यालय संस्थेच्या उपाध्यक्षा तसेच हिसई जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या सौ. नूतन घनश्याम व्यवहारे ताई यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.

ही निवड विशेष बाब ठरत असून मंगरूळपीर तालुका तसेच वाशिम जिल्ह्यातून जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौ. नूतन व्यवहारे ताई या एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून अध्यापनाची जबाबदारी सांभाळत असतानाच संगीतासारखी कलात्मक आवड त्यांनी सातत्याने जोपासली आहे. कुटुंब, शाळा, संस्था आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या छंदाला प्राधान्य देणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल माँ सरस्वती संगीत विद्यालय परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, हे यश सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सौ. नूतन घनश्याम व्यवहारे ताई यांची सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांना भावी वाटचालीसाठी अनंतकोटी शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या पुढील यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



Post a Comment

0 Comments