अंगारकी चतुर्थीनिमित्त चेहेल येथे भाविकांचा जनसागर; भव्य मोफत आरोग्य शिबिर
चेहेल | प्रतिनिधी
नवीन वर्षातील पहिलीच चतुर्थी आणि तीही अंगारकी चतुर्थी असल्याने चेहेल येथील नवश्या गणपती संस्थानात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला. श्रद्धा व भक्तीचे केंद्र असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. वर्षातील पहिली आणि विशेष महत्त्वाची चतुर्थी असल्यामुळे दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या पावन पर्वाचे औचित्य साधून दि. ६ जानेवारी २०२६ रोजी नवश्या गणपती संस्थान, चेहेल येथे भाविकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. चंद्रकांतभाऊ पाकधने (जिल्हाध्यक्ष, सरपंच संघटना वाशिम) यांच्या शुभहस्ते पार पडले.
या आरोग्य शिबिरात सास्थी प्लाझा, मंगरूळपीर येथील नामवंत डॉक्टरांनी सेवा दिली.
डॉ. सायली देशमुख खोपडे (तुळसाई दवाखाना, BAMS – PGDEMS, PGDCC, माजी मेडिकल ऑफिसर पुणे) यांनी सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले.
डॉ. अजय विश्वंभर वाघमारे (MBBS, MS – नेत्ररोग तज्ञ) यांनी डोळ्यांच्या आजारांची तपासणी केली.
मोहम्मद सोहेल (विदर्भ लॅब) यांच्या माध्यमातून शुगर व रक्तगट तपासणी करण्यात आली.
तसेच डॉ. सुहास देशमुख (मानोरा) व डॉ. गायत्री देशमुख (मानोरा) यांनी सहाय्यक डॉक्टर म्हणून मोलाचे योगदान दिले.
या शिबिरासाठी डॉ. सायली देशमुख खोपडे यांचे वडील डॉ. सुहास देशमुख (मानोरा), तसेच अतुल खोपडे, मोहम्मद सोहेल,विदर्भ लॅबची टीम आणि डॉ. सुहास देशमुख यांच्या क्लिनिकमधील सहाय्यक अंकुश व वैशाली ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मोफत आरोग्य शिबिराचा सुमारे १५०० भाविकांनी लाभ घेतला. सर्व लाभार्थ्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. भाविक व ग्रामस्थांच्या समाधानास पात्र ठरेल असे हे शिबिर शांततापूर्ण व अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवश्या गणपती संस्थान समिती, चेहेल तसेच चेहेल येथील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिरासाठी सेवा देणारे सर्व डॉक्टर, विदर्भ लॅबचे संचालक मोहम्मद सोहेल, सहसेवक व संयोजकांचे संस्थान समिती, ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. भविष्यातही असेच सहकार्य लाभो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून, अंगारकी चतुर्थीचा उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित न ठेवता सेवाभावाने साजरा करण्यात आल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत होती.
0 Comments