“स्वच्छतेच्या घोषणा हवेत, प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे साम्राज्य!”
मंगरूळपीर | प्रतिनिधी
शहर स्वच्छतेच्या नावाखाली केवळ फाईली फिरत असताना, प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेले नाले नागरिकांच्या नशिबी येत असल्याचे कटू वास्तव पुन्हा समोर आले आहे. “एक कदम स्वच्छता की ओर” हा केवळ फलकापुरताच मर्यादित राहिला असून, कुंडी पेट्यांमध्ये अनेक वर्षांपासून साचलेला कचरा आजही तसाच पडून आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक अनिल गावंडे (प्रभाग क्रमांक १) यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
नगरपरिषद ब्रह्मचारी येथील स्वच्छता विभागाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारावर गावंडे यांनी जोरदार टीका करत, “कर्मचारी नेमके कुणाची वाट पाहत आहेत? शहर दुर्गंधीने ग्रासले आहे, डासांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि प्रशासन मात्र गप्प बसले आहे,” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
प्रभागातील नाले तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. वारंवार निवेदन, तक्रारी व पाठपुरावा करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जर तात्काळ कचरा उचल व नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही, तर २६ जानेवारी रोजी नगरसेवक स्वतः नागरिकांसह रस्त्यावर उतरून शहर स्वच्छता अभियान छेडतील, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. ही कारवाई केवळ प्रतीकात्मक न राहता, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध जनआंदोलनाचे रूप घेईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या आक्रमक आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे होणार का, की नागरिकांना अजूनही कचऱ्यातच जगावे लागणार, असा प्रश्न आता शहरवासीयांमध्ये उपस्थित केला जात आहे.
0 Comments