Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी ज्योतीताई ठाकरे आक्रमक; धरणे आंदोलनात सहभाग, मान्यवरांना निवेदन


वाशिम | प्रतिनिधी

प्रकल्पासाठी जमीन देऊनही शासनाच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. या अन्यायाविरोधात मंगरुळपीर येथील समाजसेविका सौ. ज्योती ताई मनोज ठाकरे यांनी ठाम व आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनात सहभाग नोंदवला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती, वाशिम (विदर्भ प्रदेश) यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम समोर आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनात उपस्थित राहून त्यांनी समितीच्या वतीने लेखी निवेदन सादर केले.

या वेळी ज्योतीताई ठाकरे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत “शेतकऱ्यांनी विकासासाठी जमीन दिली, मात्र बदल्यात शासनाने केवळ आश्वासनांची बोळवण केली आहे. सानुग्रह निधीचे तात्काळ वितरण झाले नाही, तर आंदोलन अधिक उग्र व व्यापक केले जाईल,” असा स्पष्ट व कडक इशारा दिला.

या आंदोलनास उपस्थित राहून प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करावे व शासनदरबारी ठोस पाठपुरावा करावा, या मागणीसाठी समितीच्या शिष्टमंडळामार्फत मा. खासदार संजयभाऊ देशमुख, मा. बाबुसिंगजी महाराज (धर्मगुरू तथा आमदार, विधानपरिषद) तसेच मा. श्रीमती सईताई डहाके (आमदार, कारंजा–मानोरा) यांना मंगरुळपीर येथील समाजसेविका सौ. ज्योती ताई मनोज ठाकरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती यांच्या वतीने शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन केवळ इशारा असून, शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आता आश्वासनांचा खेळ थांबवा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या, अन्यथा होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments