Ticker

6/recent/ticker-posts

नागपुरात शिंपी समाजाचा महासागर उसळणार; रेशिमबागवर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलनाची भव्य मेजवानी


नागपुरात संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन

नागपूर : शिंपी/दर्जी समाजाच्या ऐक्य, संघटन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे भव्य संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन येत्या २२ फेब्रुवारी, रविवार रोजी नागपूर येथील ऐतिहासिक रेशिमबाग मैदान येथे पार पडणार आहे. देशभरातील शिंपी समाजातील विविध पोटजाती या महासम्मेलनाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार असल्याने समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

या महासम्मेलनात राजस्थानचे पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला, गुजरातचे पद्मश्री कन्नुभाई टेलर, तसेच प्रवीणभाई दर्जी यांसह विविध संत मंडळी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, समाजबंधू आणि भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘संत नामदेव महाराज विश्वरत्न पुरस्कार’ प्रदान सोहळा. या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (सड़क परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय, भारत सरकार) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

महासम्मेलनास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार प्रणिती शिंदे, संजयजी नहार (अध्यक्ष, सरहद्द संस्था, पुणे), खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रविकुमार राणा, खासदार नवनीत राणा तसेच ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे वंशज संत मंडळी, ह.भ.प. जितेंद्रनाथ महाराज, स्वामी गोविंदगिरी महाराज, सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज तसेच समाजातील विविध राष्ट्रीय अध्यक्ष, पदाधिकारी आणि सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मीनल अविनाश कुडाळकर (सांगली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे महासम्मेलन समाजातील एकात्मता, प्रबोधन आणि राष्ट्रीय बांधिलकी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले असून देशभरातून हजारो समाजबांधव उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या महासम्मेलनामुळे शिंपी समाजाच्या संघटनात्मक शक्तीला नवी दिशा मिळणार असून राष्ट्रीय स्तरावर समाजाची एकजूट अधोरेखित होणार आहे.

Post a Comment

0 Comments