Ticker

6/recent/ticker-posts

जी एच रायसोनी विद्यापीठाचा ६वा दीक्षांत सोहळा उत्साहात५८ मेधावी विद्यार्थ्यांना सुवर्ण-रौप्य पदके; १५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान


अमरावती प्रतिनिधी अनिता यादव 

अमरावती, जी एच रायसोनी विद्यापीठ, अमरावतीचा ६वा दीक्षांत सोहळा गुरुवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शैक्षणिक यशाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यात विविध विद्याशाखांतील एकूण १५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर विविध परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या ५८ मेधावी विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदकांसह इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

समारोहाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी होते. प्रमुख अतिथी म्हणून आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य तसेच जी एच रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांची उपस्थिती लाभली. याशिवाय कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल आणि परीक्षा नियंत्रक डॉ. विनायक डकरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

दीक्षांत सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग-सहभाग यांवर भर दिला. “विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकी जपावी आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख अतिथी डॉ. भीमराया मेत्री यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या युगात कौशल्यविकासाचे महत्त्व पटवून दिले. “आजचा विद्यार्थी हा केवळ पदवीधर नसून परिवर्तनाचा दूत आहे. नवकल्पना, नेतृत्वगुण आणि नैतिक मूल्ये यांच्या बळावरच यश संपादन करता येते,” असे ते म्हणाले. डॉ. अतुल वैद्य यांनी तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि संशोधनाच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात एकूण १५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये ३६ विद्यार्थ्यांना डिप्लोमा, ७७३ विद्यार्थ्यांना स्नातक पदवी, ६७१ विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर पदवी तर ४२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात आली. अभियांत्रिकी शाखेतील ३२१, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील २१६, विधी शाखेतील ९८, फार्मसी शाखेतील ९० स्नातक व ३२ डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंटमधील १३ पदवी व ४ डिप्लोमा तसेच स्कूल ऑफ सायन्स शाखेतील ७४८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

शैक्षणिक गुणवत्तेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५८ विद्यार्थ्यांना ३६ सुवर्णपदके व २२ रौप्यपदके प्रदान करण्यात आली. याशिवाय इतर विशेष पुरस्कारांनीही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी पदवी स्वीकारताना भावनिक क्षण अनुभवास आले.

समारोहातील विशेष आकर्षण ठरले ते ४२ संशोधकांना प्रदान करण्यात आलेल्या ‘आचार्य पदवी’ (पीएच.डी.) चे. यामध्ये स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे ३२, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे ३, School of Science चे ६ तसेच विधी शाखेतील १ संशोधकाचा समावेश होता. संशोधन क्षेत्रातील या कामगिरीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक उंचीमध्ये भर पडल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

या दीक्षांत सोहळ्याबाबत माहिती देण्यासाठी यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल व परीक्षा नियंत्रक डॉ. विनायक डकरे उपस्थित होते. समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.

जी एच रायसोनी विद्यापीठाचा हा ६वा दीक्षांत सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments