राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचा वाशिममध्ये एल्गार
“समर्पणाची भावना ठेवली तरच देश बदलेल” – कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार
शेतकरी व सर्वसामान्यांसाठी देशव्यापी आंदोलनाचा इशारा
वाशिम | प्रतिनिधी
देश बदलायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने देण्याची वृत्ती आणि समर्पणाची भावना अंगीकारली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांनी केले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या “देणार्याने देत जावे...” या कवितेचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना समाजासाठी जगण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र दौर्यादरम्यान स्थानिक विश्रामभवनात झालेल्या संघटन बैठकीत त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. बैठकीस राष्ट्रीय खजिनदार दत्ता आवारी, कार्यालयीन व्यवस्थापक अन्सार शेख, वाशिम जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी, जिल्हा सचिव संदीप पिंपळकर, रिसोड तालुका अध्यक्ष प्रशांत सरनाईक, मंगरूळपीर तालुक्यातील गजानन व्यवहारे, इरफान सय्यद, गोपाल खिराडे, सय्यद जाकीर, कैफ जाकीर, सुनील बुरे, किरण पडघान तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुनिता पाटील, गीता वोरा, उज्वला चौधरी, रचना मेहता, अश्विनीताई अवताडे आदी उपस्थित होते.
अण्णांच्या विचारांचा वारसा पुढे न्या
पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या जीवनातील पंचसुत्री प्रत्येकाने आत्मसात करावी, असे सांगताना कल्पनाताई इनामदार म्हणाल्या, “कार्यकर्ते हीच अण्णांची ताकद आहे. माहितीचा अधिकार, बदल्यांचा कायदा, दप्तर दिरंगाई कायदा यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांसाठी अण्णांनी सरकारला झुकवले. आजही ते सकारात्मक आहेत, कारण त्यांनी आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केले.”
त्या पुढे म्हणाल्या की, लोक आंदोलन न्यास कोणाची गळचेपी करण्यासाठी नाही; तर व्यवस्थेला कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यासाठी आहे. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र १०६ वेळा घटनादुरुस्ती होऊनही देशाची स्थिती बदललेली नाही. आता व्यापक जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका
शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी, सिंचन सुविधा, पीकविमा अंमलबजावणी आणि कृषी धोरणातील पारदर्शकता या मुद्द्यांवर देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. “नागरिकांनी आपल्या मूलभूत अधिकारांसाठी जागे व्हावे आणि स्वतःची ताकद वाढवावी; लोक आंदोलन न्यास सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे,” असेही कल्पनाताईंनी स्पष्ट केले.
संघटन विस्ताराला वेग
बैठकीत संघटन बांधणी व सभासद नोंदणी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा मांडला, तर मार्गदर्शनात दत्ता आवारी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झालेल्या कायदेबदलांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन व्यवहारे यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी मानले.
वाशिममधील या बैठकीने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर राज्यात नव्या आंदोलनाची नांदी दिल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू आहे.
0 Comments