Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव वाहनांचा कहर, ओव्हरलोड टिप्परचा सुळसुळाट; आरटीओ झोपेत की संगनमतात?


ओव्हरलोड , भरधाव, नियमांची पायमल्ली उघड्यावर… मग आरटीओची गाडी नेमकी शहरात फिरते कशासाठी? कारवाईसाठी की केवळ दिखाव्यासाठी?



मंगरूळपीर प्रतिनिधी : इरफान शेख

मंगरूळपीर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा ठरत असून भरधाव वाहनांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. त्यातच शहरातून राजरोसपणे धावणाऱ्या ओव्हरलोड टिप्परमुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला आहे. अपघातांची मालिका सुरू असताना जबाबदार यंत्रणा मात्र गप्प का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

दररोज मुरूम, वाळू, गिट्टी, बांधकाम साहित्य तसेच लाकूड वाहतूक करणारे मोठमोठे टिप्पर क्षमतेपेक्षा अधिक माल भरून शहरातून धावताना दिसतात. रस्त्यांची चाळण होत आहे, धुळीचे ढग उडत आहेत आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना अक्षरशः भीती वाटत आहे.

वाहतूक नियंत्रण आणि ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करणे ही आरटीओ विभागाची प्रमुख जबाबदारी असताना प्रत्यक्षात कारवाईपेक्षा ‘वसुली’लाच प्राधान्य दिले जात असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. नियमभंग उघडपणे होत असताना आरटीओ विभागाची पथके कुठे आहेत, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. कागदोपत्री मोहिमा आणि प्रत्यक्षात शून्य परिणाम, अशी परिस्थिती असल्याची टीका होत आहे.

नागरिकांचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

• राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
• ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.
• वाहतूक पोलिसांची आणि आरटीओची नियमित तपासणी दिसून येत नाही.
• नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई होत नसल्याचा आरोप.
• सीसीटीव्ही, स्पीड गन आणि कायमस्वरूपी तपासणी नाक्यांची गरज.
• दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशीची मागणी.

अपघात झाल्यानंतरच दिखाऊ कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. “कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू,” असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रशासनाने आणि आरटीओ विभागाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून शहरातील भरधाव आणि ओव्हरलोड वाहनांवर लगाम घालावा, अन्यथा वाढत्या अपघातांसाठी संबंधित यंत्रणेलाच जबाबदार धरले जाईल, असा संतप्त इशारा मंगरूळपीरकरांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments