Ticker

6/recent/ticker-posts

शेलूबाजार येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरण


शेलूबाजार, दि. ४ मार्च २०२६ (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत तसेच खासदार Sanjay Deshmukh यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे शेलूबाजार येथे दिव्यांग बांधव-भगिनी व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरण उत्साहात करण्यात आले.

अहिल्यादेवी सामाजिक सभागृह, मालेगाव रोड, शेलूबाजार येथे आयोजित कार्यक्रमात लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंगरूळनाथ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मागील वर्षी शेलूबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १५० दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती. त्या पात्र लाभार्थ्यांना आज आयोजित कार्यक्रमात आवश्यक सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. काही लाभार्थी उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांना लवकरच संपर्क साधून साहित्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


या वितरणात ADIP योजना (अपंग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे) तसेच राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) अंतर्गत श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ट्रायसायकल, काठी, वॉकर, पट्टा आदी साहित्य देण्यात आले. या उपकरणांमुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ व स्वावलंबी होणार असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी सांगितले.

लाभार्थ्यांनी शासन व आयोजकांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मंगरूळनाथ तालुका यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, तालुका विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत शेलूबाजार कर्मचारी तसेच शिव आरोग्यसेना वाशिम यांनी विशेष पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे संचालन शिवा सावके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील राऊत यांनी केले.

यावेळी जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील राऊत, तालुकाप्रमुख रामदास पाटील सुर्वे, वाशीम तालुका प्रमुख रामदास मते पाटील, तालुका संघटक बबनराव सावके पाटील, सरपंच देविदास मुखमाले, संतोष लांभाडे, अशोकराव हांडे, डॉ. श्रीराम मुखमाले, सुरेश पाटील राऊत, नंदकिशोर लांभाडे, प्रा. पवन राऊत, डॉ. अरविंद राठोड, उमेश राठोड, बंडू भाऊ वैद्य, धीरज राऊत, पांडुरंग राऊत, गोवर्धन पाटील, वसंतराव चव्हाण, मुलचंद राठोड, रमेश राठोड, गणेश बोथे, विकास कोंगे पाटील, गणेश राऊत, बाळकृष्ण रोकडे, देविदास जाधव, सतीश गावंडे, विठ्ठल खंडारे, कैलास राठोड, कृष्णा कुरवाडे, जगन्नाथ इंगोले, दिवाकर जैन, अनिल राऊत यांच्यासह तालुक्यातील दिव्यांग बांधव व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments