Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग मुलांसोबत रंगला आनंदोत्सव



मुकबधीर व दिव्यांग निवासी विद्यालय, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथे होळी उत्साहात; चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम, वरूड येथेही रंगांची उधळण

मंगरूळपीर : समाजातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सणांचा आनंद पोहोचावा या उदात्त हेतूने मुकबधीर व दिव्यांग निवासी विद्यालय, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) तसेच चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम, वरूड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग मुलांना पिचकारी व रंगांचे साहित्य वाटप करून त्यांच्या सोबत गाठी-भेटी घेत रंगोत्सव साजरा करण्यात आला.


कार्यक्रमादरम्यान लहानग्या दिव्यांग मुलांनी रंगांच्या उधळणीत मनमुराद सहभाग घेतला. पिचकारी आणि रंगांचे साहित्य पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यांतील आनंदाश्रू उपस्थितांच्या हृदयाला स्पर्शून गेले. मुलांच्या त्या समाधानाने आयोजकांनाही आत्मिक आनंद लाभला. “आपल्या छोट्याशा प्रयत्नातून कोणाच्या तरी आयुष्यात आनंद फुलतो,” ही भावना यावेळी सर्वांच्या मनात दाटून आली.

या सामाजिक उपक्रमात गीता ताई वोरा, सुनिता ललित पाटील, तेजस्विनी काळे, उमा दत्ता वाघ आणि रेखाताई शिंदे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना रंग, पिचकारी व अन्य साहित्य वितरित करण्यात आले. महिलांनी मुलांशी संवाद साधत, त्यांना प्रेमाने रंग लावत सणाचा आनंद द्विगुणित केला. त्यांच्या या मायेच्या स्पर्शामुळे मुलांच्या चेहऱ्यावर खुललेले हास्य हा उपक्रमाचा खरा गाभा ठरला.

तसेच चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम, वरूड येथेही ज्येष्ठ नागरिकांसमवेत रंगोत्सव साजरा करण्यात आला. वृद्धांनीही आनंदाने सहभाग घेत आशीर्वादाचा वर्षाव केला. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचा एकत्रित आनंदोत्सव हा सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.

समाजातील वंचित घटकांसोबत सण साजरे करण्याची ही परंपरा पुढील काळातही अविरत सुरू राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. “देवाचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहो आणि आमच्या हातून असेच समाजोपयोगी कार्य सतत घडत राहो,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 


याउपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली असून, मानवतेचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित राहावा यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments