मंगरूळपीर : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी घटना घडली असून, येथील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. सुषमा सुरेश जाजू यांनी गृहअर्थशास्त्र या विषयात पीएच.डी (आचार्य) पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण मंगरूळपीर परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात प्रा. जाजू या अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी ही उच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे.
प्रा. जाजू यांच्या या यशाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलजी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शरदजी वाघोळे, डॉ. संजयजी इंगळे, श्री विलास भाऊ गावंडे, श्री चंद्रकांतजी इंगळे तसेच श्री गिरबिडे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. राहुलजी सुर्वे यांनी प्रा. जाजू यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात अध्यापनासोबत संशोधन क्षेत्रातही सातत्य राखणे हे सोपे काम नाही. मात्र प्रा. जाजू यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर हे यश संपादन करून इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.” तसेच उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या जिद्दीचे आणि शैक्षणिक बांधिलकीचे कौतुक केले.
समारंभात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सर्वांनी प्रा. जाजू यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रा. सुषमा जाजू यांच्या या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, संस्थेचे सचिव मा. चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले.
संशोधन आणि अध्ययन क्षेत्रात अधिक भरीव कार्य करण्याचा त्यांचा मानस असून, समाजोपयोगी संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून, भविष्यातही असेच शैक्षणिक यश संपादन करण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळणार आहे.
एकूणच, प्रा. सौ. सुषमा सुरेश जाजू यांचे हे यश मंगरूळपीरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या या कर्तृत्वामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments