मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) – शहरातील वाढत्या अस्वच्छता, मच्छरांचा प्रादुर्भाव, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि विकासकामांतील ढिलाई यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेत मंगरूळपीर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांनी आज नगरपरिषदेतच एक अनोखे, धडक आणि आक्रमक आंदोलन छेडत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार एल्गार पुकारला. या आंदोलनामुळे नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
वारंवार सूचना देऊन, बैठका घेऊन आणि निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती होत नसल्याने अखेर उपनगराध्यक्ष गावंडे यांनी थेट सभागृहात धूप पूजन करत प्रतीकात्मक पण तितक्याच तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. शहराच्या विकासासाठी आणि यंत्रणेला ‘तालावर आणण्यासाठी’ हा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेने उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
“नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सहन नाही” – गावंडे यांचा इशारा
यावेळी बोलताना अनिल गावंडे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, “शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वेळेवर साफसफाई होत नाही, नाल्या तुंबलेल्या आहेत, आणि मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. आता तरी जागे व्हा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.”
शहरात धूळ फवारणी व फॉगिंगचा पूर्णतः अभाव असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका वाढत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. “आज परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर उद्या मोठा आरोग्यसंकट निर्माण होऊ शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.
पाणीटंचाईने नागरिक हैराण; प्रशासन झोपेतच?
मंगरूळपीर शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा अनियमित तर काही भागांमध्ये पूर्णतः ठप्प झाल्याची तक्रार आहे. महिलांना व नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने गावंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पाणी हा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणे ही प्रशासनाची मोठी अपयश आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
विकासकामांमध्ये ‘फिफ्टी-फिफ्टी’; संतुलनाचा प्रयत्न
बैठकीदरम्यान नगरपरिषद क्षेत्रातील विविध योजनांअंतर्गत विकासकामांना मंजुरी देण्याबाबतही चर्चा झाली. ‘प्यार का वादा, फिफ्टी-फिफ्टी’ या तत्त्वावर शहराच्या सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी कामांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, मंजुरी दिलेल्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळेत होणे गरजेचे असल्याचेही नगरसेवकांनी अधोरेखित केले.
भाजप नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा; प्रशासनावर दबाव वाढला
या आंदोलनाला भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी पाठिंबा दर्शवत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. गटनेते गणेश भाऊ खोडे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्याची, नियमित साफसफाई, नाल्यांची स्वच्छता, तसेच फॉगिंगची व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
नगरपरिषद परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी वर्गावर तातडीने काम करण्याचा दबाव वाढला असून नागरिकांमध्येही या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
“आता कृती हवी, केवळ आश्वासने नकोत” – नागरिकांचा सूर
दरम्यान, या आंदोलनानंतर शहरातील नागरिकांनीही प्रशासनाकडून तातडीने ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. “आश्वासने खूप झाली, आता प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे,” असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
आगामी काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता
उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर शहरातील स्वच्छता, मच्छर नियंत्रण आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
एकूणच, या धडक आणि अनोख्या आंदोलनामुळे मंगरूळपीर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली असून आगामी काळात या प्रश्नांवर कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
0 Comments