वाशिम : समाजसेवा, मानवता आणि तात्काळ मदतीची जिवंत परंपरा जपणारे सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांचा मराठी पत्रकार संघ यांच्या वाशिम येथे आयोजित अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असताना झालेला हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, कारंजा तालुक्याच्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आपत्कालीन प्रसंगात धर्म, जात, पंथ न पाहता मदतीचा हात पुढे करणारे श्याम सवाई हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात अखंड झटत आहेत. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य, संकटग्रस्तांना धीर देत त्यांना उभारी देणे—या सर्व कार्यातून त्यांनी मानवतेचा दीप सतत प्रज्वलित ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वधर्म आपत्कालीन संस्थेने असंख्य जीवांना वेळेवर मदत पोहोचवून आशेचा किरण दिला आहे.
सन्मानचिन्ह स्वीकारताना श्याम सवाई यांनी हा गौरव संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना व कारंजा तालुक्यातील जनतेला समर्पित केला. “समाजासाठी केलेले कार्य हे कर्तव्य आहे, त्यात मान-सन्मान दुय्यम आहेत,” अशी नम्र भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या साधेपणाने उपस्थितांच्या मनात अधिक आदर निर्माण झाला.
समाजात वाढत्या असंवेदनशीलतेच्या काळात निस्वार्थी सेवेची परंपरा जपणारे कार्यकर्ते हीच खरी ताकद असल्याचे अधोरेखित करत अनेक मान्यवरांनी श्याम सवाई यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या या सन्मानामुळे कारंजा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून युवकांना समाजकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे.
श्याम सवाई यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, अधिक बळ आणि यश लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
0 Comments