वाशिम (सुधाकर चौधरी) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा ठरलेला पासपोर्ट सुविधेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, २१ एप्रिलपासून वाशिम येथे मोबाईल पासपोर्ट सेवा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या यशामागे खासदार संजय देशमुख यांचा सातत्यपूर्ण, आक्रमक आणि परिणामकारक पाठपुरावा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे विशेष कौतुक व्हावे, अशी मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.
आजवर वाशिम जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना हिंगोली, अकोला किंवा अमरावती येथे जाऊन कामे करावी लागत होती. यासाठी दिवसन्दिवस खर्च, प्रवास आणि वेळ यांचा मोठा बोजा सहन करावा लागत होता. अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या युवकांना या अडचणींमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. ही केवळ सुविधा नव्हे, तर नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित समस्या बनली होती.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार संजय देशमुख यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्राद्वारे मागणी, दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची प्रत्यक्ष भेट, तसेच नागपूर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधत त्यांनी हा विषय उच्च पातळीवर पोहोचवला. एवढ्यावरच न थांबता लोकसभेतही हा मुद्दा ठामपणे उपस्थित करून जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
या अथक प्रयत्नांचे फळ अखेर मिळाले असून, आता पासपोर्टसंबंधित ओळख पडताळणी, नूतनीकरण आणि इतर प्रक्रिया वाशिममध्येच मोबाईल व्हॅनद्वारे पूर्ण होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांनाही या सेवेचा थेट लाभ मिळणार आहे.
जनतेतून कौतुकाची लाट
या निर्णयानंतर वाशिम जिल्ह्यात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खासदार संजय देशमुख यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. “प्रश्न फक्त मांडणारा नव्हे, तर तो मार्गी लावणारा लोकप्रतिनिधी” अशी त्यांची ओळख अधिक बळकट झाली आहे. अनेक सामाजिक संस्था, युवक आणि नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे अभिनंदन करत, भविष्यातही अशाच प्रकारे विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधीपदाला न्याय देणारे कार्य
विकासकामे केवळ आश्वासनांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्षात आणण्याची क्षमता दाखवणारे हे उदाहरण मानले जात आहे. वाशिम जिल्ह्यासाठी पासपोर्ट सेवा सुरू होणे ही केवळ प्रशासकीय सुविधा नसून, लोकप्रतिनिधीच्या जिद्दी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय आहे.
एकूणच, वाशिम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरत असून, नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आता या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0 Comments