Ticker

6/recent/ticker-posts

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला

कोपरखैरणे येथील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळल्यानंतर अग्निशमन दलाकडून सुरू असलेले बचावकार्य.



वार्ताहर : अनंतराज गायकवाड
वाशी, नवी मुंबई | दि. ०६ मार्च २०२६

१४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; १२ विद्यार्थी व शिक्षिका सुखरूप रेस्क्यू

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर २, प्लॉट क्र. १२ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती शिकवणी सुरू असताना अचानक पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत शिकवणीसाठी आलेले अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

अग्निशमन दलाच्या पथकाने एकूण १२ विद्यार्थी व एक शिक्षिका अशा १३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान उपचार सुरू असताना मनीष मसे (वय १४) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती वाशी मनपा रुग्णालय प्रशासनाने दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात अग्निशमन दलाला सहकार्य केले. दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

ढिगाऱ्याखालून १३ जणांची सुटका

अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने बचावकार्य राबवत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

 रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे

सिद्धांत गुप्ता (वय ८)
प्रिन्स सोनी (वय ११)
आयशा कुसुम (वय १५)
निष्का धनवाडे (वय १४)
मनीष मसे (वय १४)
आराध्या बोडसे (वय १४)
तन्वी श्रीवास्तव (वय ७)
देवांश पुजारी (वय १२)
राजदीप वानखेडे (वय १०)
पार्थ खैरनार (वय १४)
रुद्र येलूरकर (वय ५)
शिक्षिका शामली चौधरी (वय ५३)


Post a Comment

0 Comments